
ठाण्याच्या शास्त्रीनगरमधील बेकायदा चाळींवर अखेर ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागाने हातोडा मारला आहे. लोकमान्यनगर, सावरकरनगर प्रभाग समितीच्या परिसरातील शास्त्रीनगरमध्ये दिवसाढवळ्या नाल्यावर गाळे आणि चाळींचे बेकायदा बांधकाम सुरू होते. पालिकेच्या अतिक्रमण पथकाने हे बांधकाम आज पूर्णपणे जमीनदोस्त करत प्रशासनाने येथील माफियांना दणका दिला आहे.
मुंब्र्यातील खान कंपाऊंड सपाट झाले असताना चाळमाफिया ठाण्याच्या शास्त्रीनगरमध्ये घुसखोरी करत खुलेआम बेकायदा चाळींचे बांधकाम सुरू केले होते. या बेकायदा बांधकामांवर पालि का कारवाई करणार का? भूमाफियांवर मोक्काअंतर्गत कारवाई करणार का? असा सवाल या भागातील स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाला केला होता. त्यानंतर झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग येताच या बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
पिलर, कोबा भुईसपाट
ज्येष्ठ नागरिक कट्टयालगत, हत्तीपुलाजवळ, शास्त्रीनगर येथे असलेले सिमेंटचे आठ पिलर व त्याखालील सिमेंटचा कोबा तसेच उभारण्यात आलेले गाळे जेसीबी मशीन व मनुष्यबळाच्या सहाय्याने भुईसपाट करण्यात आले.