
सध्या दिवाळीची सुट्टी असल्याने ठाणेकरांनी कुटुंबकबिल्यासह गाव गाठले आहे. तर काही जणांनी हिल स्टेशन, पर्यटनवारीसाठी ठाण्याबाहेर गेले आहेत. मात्र यामुळे टीएमटीचा गल्ला जवळपास अर्ध्यावर आला असल्याचे समोर आले आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची संख्या कमालीची रोडावल्याने टीएमटीचे उत्पन्न घटले असून आठ दिवसांत ३२ लाखांचे नुकसान झाले आहे.
सण, उत्सवाच्या काळात ठाणेकर नागरिक मोठ्या प्रमाणावर आपल्या गावी जातात. त्यामुळे याचा परिणाम ठाणे परिवहन सेवेच्या उत्पन्नावर होताना दिसत आहे. यंदा दिवाळी सणाच्या चार दिवसांच्या काळात प्रवासी संख्येत चांगलीच घट झाली आहे. प्रतिदिन सरासरी फक्त आठ लाख एवढे कमी उत्पन्न परिवहन सेवेच्या तिजोरीत जमा झाले आहे. इतर दिवशी ठाणे परिवहन सेवेचे उत्पन्न हे प्रतिदिन साधारण २६ ते २७ लाखांच्या आसपास असते. मात्र १८ ऑक्टोबर रोजी ठाणे परिवहन सेवेच्या बसमधून ८ हजार २८१ प्रवाशांनी प्रवास केला. त्यामाध्यमातून परिवहन सेवेला २२ लाख ६० हजार इतके उत्पन्न मिळाले. मात्र सोमवार ते गुरुवार या चार दिवसांच्या काळात उत्पन्नात घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
सोमवारी अवघे दोन हजार प्रवासी
दिवाळीच्या पहिल्या दिवशी टीएमटी बसमधून अवघ्या २ हजार ५१० प्रवाशांनी प्रवास केला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ३ हजार ४०० प्रवासी, दीपावली पाडव्या दिवशी ३ हजार तर भाऊबीज दिवशी फक्त ५ हजार ५८८ ठाणेकर प्रवाशांनी टीएमटीला पसंती दिली. त्यामुळे जवळपास आठ लाख रुपयांचे नुकसान परिवहन विभागाला सहन करावे लागले आहे.






























































