
ठाणे शहरात बेकायदा शाळांचे पीक फोफावले असल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या बेकायदा शाळा बंद करण्याच्या परीक्षेत ठाणे पालिका सपशेल ‘नापास’ झाली आहे. तर 81 बेकायदा शाळांची यादी प्रशासनाने पुन्हा जाहीर केली असून शिक्षण विभाग फक्त कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त आहे. दरम्यान जिल्ह्यात सर्वात जास्त बेकायदा शाळा या ठाण्यात असल्याचे समोर आले आहे.
ठाणे पालिकेच्या हद्दीत 81 बेकायदा शाळा असून सर्वात जास्त शाळा या मुंब्रा आणि दिव्यात आहेत. काही शाळांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून नोटिसा बजावण्यात आल्यानंतरही मुजोर संचालकांनी शाळा बंद केल्या नाहीत. बेकायदा शाळांवर कारवाई करण्यासाठी ठाणे पालिकेच्या शिक्षण विभागाने 9 पथकांची स्थापना केली होती. या प्रत्येक पथकात ४ सदस्यांची नियुक्तीदेखील करण्यात आली. मात्र बेकायदा शाळा बंद करण्यात प्रशासनाला अपयश आल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
आदेशाला ‘नकार घंटा’
वार्षिक परीक्षा झाल्यानंतर ठाण्यातील सर्व बेकायदा शाळांना टाळे ठोका, असे स्पष्ट आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रशासनाला दिले होते. तसेच संचालकांवर अजामीनपात्र कलमांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करा असेही सांगितले. मात्र अद्याप एकाही शाळेवर कारवाई करण्यात आलेली नसल्याची माहिती मेस्टा संघटनेने केली आहे. शिक्षणाच्या नावाखाली राजकीय नेते मंडळी आणि शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही संस्थाचालक बेकायदा शाळा उभारत आहेत.