
न्यायालयाच्या दट्ट्यानंतर एकीकडे मुंब्यातील खान कंपाऊंड सपाट झाले असताना चाळमाफिया ठाण्याच्या शास्त्रीनगरात घुसले आहेत. ठाणे पालिकेच्या जमिनी बळकावून ठाण्यात खुलेआम बेकायदा चाळीची बांधकामे सुरू असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बेकायदा बांधकामांवर तत्काळ कारवाई करून भूखंड मोकळे करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही कारवाई होत नसल्याने अधिकारी नेमके कुणाचे ‘मिंधे’, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
बेकायदा बांधकामांमुळे ठाणे शहर बदनाम झाले आहे. घोडबंदर कोपरी, वर्तक नगर, कळवा, मुंब्रा आणि दिव्यात बेकायदा इमारती उभारण्याचा सपाटा सुरूच आहे. त्यापाठोपाठ आता शास्त्रीनगर येथे पालिकेच्या राखीव भूखंडावर बेकायदा गाळे, चाळी बांधण्याचे काम सुरू झाले आहे. दिवसाढवळ्या भूखंडाच्या भूखंड भूमाफियांकडून गिळंकृत केले जात आहेत. या बेकायदा बांधकामांवर तत्काळ कारवाई करून भूखंड मोकळे करण्याचे आदेश दिले होते. मात्र पालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवली असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
ठाणे महापालिकेचे शास्त्रीनगर विभागात मोक्याच्या जागी हे भूखंड आहेत. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कट्टा, आरोग्य केंद्र, डीपी रोडचे या भूखंडावर नियोजन आहे. तशी वर्क ऑर्डरही निघाली आहे. मात्र तरीसुद्धा ठाणे महापालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बांधकाम होत आहे.
अन्यथा प्रभाग समितीवर पुन्हा मोर्चा
नोव्हेंबर 2024 मध्ये स्थानिकांनी लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समितीवर मोर्चा काढला होता. त्यावेळी पालिका अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश असतानादेखील कारवाई झाली नाही. उलट भूमाफियांना मोकळे रान करून देण्यात आहे. शास्त्रीनगरमधील बेकायदा बांधकामांवर कारवाई न झाल्यास प्रभाग समितीवर पुन्हा मोर्चा काढण्याचा इशारा या भागातील स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.