
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत २ जानेवारीपर्यंत आहे. त्यानंतर १५ जानेवारीला मतदान आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी केवळ १२ दिवसांचा मर्यादित कालावधी उपलब्ध असून १२ दिवसांत ६० हजार मतदारांपर्यंत पोहोचण्याची कसरत उमेदवारांना करावी लागणार आहे.
आतापर्यंत केडीएमसीच्या पाचही निवडणुका एक प्रभाग एक नगरसेवक या पद्धतीने पार पडल्या होत्या. मात्र यंदा १२२ नगरसेवकांच्या निवडीसाठी ३१ पॅनल तयार करण्यात आले असून पैकी २ ठिकाणी तीन प्रभागांचे तर उर्वरित २९ ठिकाणी चार प्रभागांचे पॅनल आहेत. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला तीन ते चार प्रभागांमध्ये प्रचार करावा लागणार आहे.
मतदानाच्या ४८ तास आधी प्रचाराची सांगता करावी लागणार असून १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रत्यक्ष प्रचारासाठी २ ते १४ जानेवारी असा अवघा १२ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. पूर्वी एका प्रभागापुरता प्रचार असल्याने उमेदवार घरोघरी जाऊन थेट मतदारांशी संवाद साधू शकत होते. मात्र सध्याच्या पॅनल पद्धतीत तीन-चार प्रभागांतील मतदारांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचणे जवळपास अशक्य असल्याचा सूर उमेदवारांकडून व्यक्त केला जात आहे.
प्रचारतंत्राची कसोटी
पूर्वी एका प्रभागात १० ते १२ हजार मतदार असायचे. मात्र पॅनल पद्धतीत तीन ते चार प्रभागांचा समावेश असल्याने ५० ते ६० हजारांहून अधिक मतदार संख्या आहे. एवढ्या मोठ्या मतदारसंख्येपर्यंत अवघ्या १२ दिवसांत पोहोचणे हे उमेदवारांसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. एकूणच पॅनल पद्धतीमुळे केडीएमसी निवडणूक ही केवळ राजकीय लढत न राहता संघटन, आर्थिक ताकद आणि आधुनिक प्रचारतंत्राची कसोटी ठरणार आहे.






























































