
लहान बहिणीचा जीव वाचवण्यासाठी बहाद्दर हाली बरफ थेट वाघाशी लढली होती. शहापूरच्या या ‘वाघिणी’च्या शौर्याची दखल घेत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते तिला ‘राष्ट्रीय शौर्य पुरस्कार’ने गौरवण्यात आले होते. तिच्या शौर्याची नोंद महाराष्ट्रातील शालेय पाठ्यपुस्तकांतदेखील आहे. मात्र वाघाशी वाढलेली ही बछडी परिस्थितीपुढे हरली आहे. प्रशासनाने आश्वासन देऊनही तिला अद्याप नोकरी दिली नाही. त्यामुळे हाताला काम नसल्याने या मुलीवर गवत विकून जीवन जगण्याची वेळ आली आहे.
हाली बरफ मागील काही वर्षांपासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर अंतर्गत खर्डी येथील मुलींच्या वस्तिगृहात रोजंदारीवर काम करत होती. त्याआधी तिने शासकीय आश्रम शाळा पेंढरघोळ व शासकीय मुलींचे वस्तिगृह शहापूर येथेही सेवा बजावली होती. परंतु मागील सहा महिन्यांपासून तिच्या हाताला काम नाही. परिणामी जगण्यासाठी तिला गावागावांत मजुरी करावी लागत आहे. जंगलातील गवत कापून ते विकून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची वेळ तिच्यावर आली आहे. एकीकडे स्वतःच्या बहिणीचे प्राण वाचवणाऱ्या आणि वाघाशी झुंज देणाऱ्या या धाडसी आदिवासी कन्येला देशभरातून गौरवले गेले असून तिच्या शौर्यकथेवरून विद्यार्थी प्रेरणा घेतात, परंतु शासनाने तिला आजवर कायमस्वरूपी नोकरी वा रोजगाराचा आधार दिला नाही, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रभारी प्रकल्प अधिकारी दिवाकर काळपांडे यांच्याकडे निवेदन देऊन हाली बरफ हिला तातडीने कायमस्वरूपी नोकरी द्यावी किंवा शासकीय सेवेत समाविष्ट करून तिच्या शौर्याचा सन्मान करावा, अशी मागणी केली होती.