मीरा-भाईंदर महापालिकेचा खड्डे घोटाळा;दगडांऐवजी डेब्रीजचा केला जातोय वापर

मीरा-भाईंदर शहरात एमएमआरडीएने भरपावसात रस्त्यावर खड्डे भरण्याचा कारनामा केल्यानंतर आता पालिका प्रशासनाने मास्टिक अस्फाल्ट पद्धतीने डांबरीकरणाच्या नावाखाली मोठा झोल सुरू केला आहे. या पद्धतीने रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी सुमारे सेंटीमीटरच्या दगडांचा वापर केला जातो. मात्र पालिकेचा ठेकेदार हे दगड वापरण्याऐवजी डेब्रीजचा वापर करीत आहेत. हा प्रकार कोणाच्याही निदर्शनास येऊ नये यासाठी खड्डे भरण्याचे काम रात्री अपरात्री केले जात आहे. महापालिका प्रशासनाचा हा खड्डे घोटाळा उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि रस्त्यांचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या अडचणी असून पालिका प्रशासन वाढल्या आहेत.

मीरा-भाईंदर शहरातील सर्व रस्ते खड्ड्यात गेले आहेत. त्याचा जोरदार फटका नागरिकांना बसत आहे. सर्वत्र खड्यांची चाळण झाल्यामुळे पालिका प्रशासनावर सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील खड्डे आता मास्टिक अस्फाल्ट पद्धतीने भरण्यास सुरुवात केली आहे. मास्टिक अस्फाल्ट पद्धतीने डांबरीकरणाचे काम करताना रोडच्या वरच्या थरात 25 ते 30 सेंटीमीटरचे दगड टाकायचे असतात. या पद्धतीने खड्डें बुजवताना मोठी खबरदारी घ्यावी लागते. खड्ड्यातील डांबर आणि दगड बाहेर येऊन पुन्हा खड्डा होणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. मात्र पालिकेच्या ठेकेदाराकडून सध्या फक्त थुकपट्टी सुरू आहे. हे खड्डे फक्त नावापुरते भरले जात असल्याने ते पाऊस पडल्यानंतर उखडले जाणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांना आणि नागरिकांना पुन्हा चाळण होणार आहे. पालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्याकडून खड्डे भरण्याच्या नावाखाली मोठा झोल सुरू असल्याचे सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठली आहे.

… तर ठेकेदारावर कारवाई करणार
ज्याठिकाणी शहरात खड्डे दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे, त्याठिकाणच्या कामाची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कामे नियमानुसार करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. जर काम चुकीच्या पद्धतीने केले जात असेल तर संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता नितीन मुकणे यांनी व्यक्त केली आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष
शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवताना महापालिका अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाहणी करावी. तसेच ज्याठिकाणी काम सुरू आहे त्याठिकाणी खोदकाम करून खड्डा साफसफाई करणे आवश्यक आहे. खड्यात नव्याने मास्टिक अस्फाल्ट डांबर टाकून काम करायचे असते. हे काम करताना ठेकेदार कामगारांचा जीव धोक्यात तर घालीत नाही ना, यावरही नियंत्रण असायला हवे. मात्र दुर्दैवाने यावर कोणतेही नियंत्रण महापालिका प्रशासनाचे नाही. त्यामुळे ठेकेदाराचे उखळ पांढरे झाले आहे, अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक रोहित सुवर्णा यांनी व्यक्त केली आहे.