मुरुडच्या जंजिरा किल्ल्यावर मिळणार क्यूआर कोड गाईड; स्कॅन करताच ऑडिओतून ऐतिहासिक माहिती, हजारो पर्यटकांना दिलासा

पर्यटनस्थळ तसेच एखाद्या ऐतिहासिक ठिकाणाची माहिती मिळवण्यासाठी पैसे मोजून गाईड घ्यावा लागतो. मात्र मुरुडच्या जंजिरा किल्ल्यावर आता फ्रीमध्ये क्यूआर कोड गाईड मिळणार आहे. यासाठी किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर क्यूआर कोड बसवण्यात आले असून स्कॅन करताच ऑडिओतून इतंभूत माहिती कळणार आहे. त्यामुळे हजारो पर्यटकांना दिलासा मिळणार आहे.

किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील तिकीट बुकिंग कार्यालयालगत हे क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. पर्यटकांनी स्कॅन करताच ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याची ऑडिओद्वारे माहिती मिळणार आहे. हा ऑडिओ पाच मिनिटांचा आहे. यामध्ये हा किल्ला कोणत्या वर्षी बांधला, तो कोणी बांधला, कसा बांधला, या किल्ल्यात किती तोफा आहेत, याची माहिती सांगण्यात आली आहे. त्यासाठी पर्यटकांनी ‘जंजिरा फोर्ट ई-वॉक ऑडिओ गाईड जंजिरा किल्ला’ स्कॅन करा, असे आवाहन पुरातत्व विभागाचे सहाय्यक संवर्धक अधिकारी-बजरंग येलीकर व पुरातत्व बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुगरे यांनी केले आहे.

जलप्रवासातील लूट थांबणार

किल्ल्यावर नेणाऱ्या बोटचालकांकडून किल्ल्याची माहिती प्रवासादरम्यान पर्यटकांना दिली जाते. मात्र अनेकदा गाईड करण्याच्या नावाखाली अवाचे सवा पैसे घेऊन लूट केली जात असल्याचा आरोप पर्यटकांनी यापूर्वी केला होता. मात्र आता या क्यूआर कोड प्रणालीमुळे पर्यटकांना फायदा होणार आहे.