खुराड्यात शिरलेल्या नागाने कोंबडीची नऊ अंडी गिळल्याची घटना विक्रमगड तालुक्यातील वसुरी येथे घडली. खुराड्यात घुसताच नागाने दंश केल्याने कोंबडीचा मृत्यू झाला. फणा काढून बसलेल्या नागाला सर्पमित्राने पकडून जंगलात सोडले. नागाला पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
विक्रमगड तालुक्यातील वसुरी (साठेपाडा) या गावातील रमेश भोये यांच्या घरात कोंबड्यांचे खुराडे आहे. खुराड्यामध्ये नाग पाहताच रमेश भोये घाबरले. त्यांनी तत्काळ सर्पमित्र पप्पू दिघे यांना याची माहिती दिली. पप्पू दिघे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत नागाला शिताफीने पकडले. नागाने कोंबडीची नऊ अंडी फस्त केली होती. सर्पमित्राने नागाला बाहेर आणताच नागाचे पोट फुगलेले होते. काही वेळातच नागाने गिळलेली नऊ अंडी बाहेर काढली. यानंतर नागाला जीवदान देत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.