माथेरान घाटात ट्रॅफिक जाम, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची आज माथेरान घाटात चांगलीच कोंडी झाली. दस्तुरी नाका येथे वाहन पार्किंगची व्यवस्था आहे. मात्र नियोजनशून्य कारभारामुळे पार्किंग फुल्ल झाली आणि घाटात दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही पर्यटकांना तर वाहनातून उतरून घाट चढत माथेरान गाठावे लागल्याने त्यांचा घामटा निघाला. तब्बल तीन तासानंतर ट्रफिककोंडी फुटल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.

मान्सून सुरू झाला असून थंड हवेचा आनंद घेण्यासाठी माथेरामध्ये पर्यटकांची वीकेंडला गर्दी होते. शनिवारी वीकेंड असल्याने पर्यटकांचा लोंढा माथेरान दिशेने वळला होता. शाळेलाही सुट्ट्या असल्याने माथेरानला येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक होती. दस्तुरी नाका येथील वाहन पार्किंग सेवा फुल्ल झाली. नियोजनाअभावी पार्किंग लवकरच फुल्ल झाल्याने दस्तुरी वाहनतळ ते गारबट येथील रस्त्यावर अडीच किलोमीटर अंतरपर्यंत पर्यटकांची वाहने अडकून पडली होती. घाटात झालेल्या वाहतूकोंडीमुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे तीन तास पर्यटकांना वाहनातच बसून राहावे लागले. काही पर्यटकांनी वाहनातून उतरून माथेरान गाठले.

जुमापट्टीजवळ वाहनतळाची व्यवस्था

वाहतूककोंडीची माहिती मिळताच पोलीस पथक आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जुमापट्टी येथे वाहनांची व्यवस्था करण्यात आली. वाहनांचे योग्य नियोजन केल्याने दुपारी साडेबाराच्या सुमारास वाहतूककोंडी सुटली. दस्तुरी नाका येथील वाहनतळाची जागा वाढवण्याचे नियोजन प्रशासन करत नसल्याने घाटात वारंवार वाहतूककोंडी होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.