
भिवंडी गुन्हे शाखेने चमकदार कामगिरी करत बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त केला आहे. याप्रकरणी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या असून 45 लाख 50 हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. तसेच नोटा छापण्यासाठी वापर केलेला लॅपटॉप, प्रिंटर, कटिंग करण्यासाठी वापरलेले कटर, बॉण्ड पेपर हे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
भिवंडीमधील अवचित पाडा येथे काही जण 500 च्या बनावट नोटा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार आणि त्यांच्या पथकाने फिल्डिंग लावून सूरज शेंडे, भरत सासे व स्वप्नील पाटील या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून 30 लाखांच्या 500 च्या बनावट नोटा जप्त करून याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या नोटा रामदास दळवी याच्या ट्रान्सपोर्ट कार्यालयात छापल्या जात असल्याचे समजताच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त केला. त्या नोटांची कमिशनद्वारे विक्री केली जात असल्याची माहिती गुरुवारी ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली.
मास्टरमाईंड दळवी उच्चशिक्षित
रामदास दळवी हा एमएस्सी उच्चशिक्षित असून त्याला प्रिंटिंगचे ज्ञान आहे. त्याच्याच ट्रान्सपोर्ट कार्यालयात या नोटा छापल्या जात होत्या. नोटा छापण्याचा हा त्याचा पहिलाच प्रयत्न असल्याचे त्याने सांगितले. तसेच तोच या गुन्ह्यातील मास्टरमाईंड असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त जाधव यांनी बोलताना दिली.