ठाण्यात विजेचा रोजच खेळखंडोबा; उद्योगधंदे गुजरातला न्यायचे काय? वागळेतील उद्योजकांचा सरकारला सवाल

केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारने लादलेला विविध करांचा भरमसाट बोजा यामुळे कारखाने, उद्योगधंद्यांचे कंबरडे मोडले आहे. आधीच खंगलेला उद्योग आता वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पुरता जेरीस आला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट औद्योगिक पट्ट्यात विजेचा रोजच खेळखंडोबा सुरू असून उद्योजकही अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे हैराण झाले आहेत. त्यामुळे आता आम्ही कारखाने गुजरातला न्यायचे का? असा निर्वाणीचा इशारा उद्योजकांनी सरकारला दिला आहे. ठाणे लघुउद्योजकांची संघटना असलेल्या ‘टिसा’च्या माध्यमातून आज महावितरण अधिकारी आणि उद्योजकांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उद्योजकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.

ठाण्याचा वागळे इस्टेट परिसर हा औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी लघु आणि मध्यम उद्योगांसह मोठ्या प्रमाणात आयटी पार्कदेखील आहेत. गेल्या तीन वर्षांपासून या भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योजकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. नेहमी होणाऱ्या विजेच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन (टिसा) येथे महावितरण अधिकारी आणि उद्योजक यांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ठाणे शहरासह कल्याण, शहापूर, पनवेल, खालापूर, कळंबोली अशा विविध भागातील 50 ते 60 उद्योजक या बैठकीला उपस्थित होते.

वागळे औद्योगिक क्षेत्रात वीजपुरवठाच्या तुलनेने विजेची मागणी आणि भार वाढला आहे. पूर्वी सात इनकमर वाहिन्या होत्या, गेल्या काही वर्षांपासून पाच आहेत. लोड मात्र दहापटपेक्षा जास्त वाढला आहे. त्यामुळे या भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.