
मुदत संपल्यानंतर भाजपच्या तीन, तर शिंदे गटाच्या दोन उमेदवारांचे एबी फॉर्म आल्यामुळे या पाच उमेदवारांच्या अर्जाला पक्षाला एबी फॉर्म जोडता आला नाही. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाला जोरदार धक्का बसला असून या पाचही उमेदवारांना आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे.
थेरगाव येथील ग क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक 21, 23, 24 आणि 27 च्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले. मुदत संपल्यानंतर भाजपा आणि शिंदे गटाचे प्रभाग 24 मधील उमेदवार मंगळवारी (दि. 30) क्षेत्रीय कार्यालयात आले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी दुपारी तीननंतर उमेदवार एबी फॉर्म भरण्यासाठी आल्याने ते स्वीकारले नाहीत. त्यानंतर मोठा गोंधळ झाला. अधिकाऱ्यांसोबत त्या उमेदवारांनी वाद घातला. तो वाद वाढत गेला. अखेर, महापालिकेचे आयुक्त, निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उमेदवार एबी फॉर्म घेण्याचा आग्रह करत होते. दुपारी तीननंतर एबी फॉर्म स्वीकारला जाणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार
बुधवारी उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली. प्रभाग क्रमांक 24 मध्ये भाजपाचे उमेदवार गणेश गुजर, शालिनी गुजर, करिश्मा बारणे यांना पक्षाचा एबी फॉर्म तसेच शिंदे गटाच्या रुपाली गुजर व अनिकेत प्रभू यांना पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे हे उमेदवार पक्षचिन्हावर लढू शकणार नाहीत. आता या पाचही उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे प्रभाग 24 मध्ये कमळ चिन्हाचा फक्त एकच तर शिंदे गटाच्या चिन्हाचे दोनच उमेदवार असणार आहेत. त्यामुळे या प्रभागात विरोधी पक्षाच्या उमेदवारांना फायदा होण्याची शक्यता आहे.
पाच उमेदवारांचे एबी फॉर्म तीननंतर आले होते. त्यामुळे ते अर्ज स्विकारले नाहीत. या उमेदवारांना पक्षाचे चिन्ह मिळणार नाही.
– श्रावण हर्डीकर,
निवडणूक अधिकारी.






























































