
नाताळची सुट्टी आणि त्याला लागून आलेल्या शनिवार, रविवारची संधी साधत हजारो लोक थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडले आहेत. रायगड, रत्नागिरीपासून सिंधुदुर्गपर्यंत कोकणातील सर्वच समुद्रकिनाऱयांवर पर्यटकांची मोठी ‘भरती’ आली आहे. मालवण, वेंगुर्ले, देवगड देशीविदेशी पर्यटकांनी गजबजले आहे.
सिंधुदुर्ग जिह्यातील मालवणसह देवबाग, तारकर्ली, निवती, आचरा, वेंगुर्ले, सागरेश्वर, शिरोडा-वेळागर, भोगवे, खवणे, देवगड, कुणकेश्वर या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. जिह्यातील सर्वच पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल झाली आहेत. येत्या दोन दिवसांत पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक प्रामुख्याने समुद्रकिनाऱ्यांना पसंती देतात. त्याचा फायदा निसर्गरम्य किनारा लाभलेल्या कोकणला होत आहे. सूर्यास्त पाहण्यासाठी सायंकाळच्या वेळी किनाऱयांवर गर्दी होत आहे.
- समुद्रकिनारे आणि इतर ठिकाणांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्लेही पर्यटकांच्या आकर्षणाचे पेंद्रबिंदू ठरले आहेत. सिंधुदुर्ग, राजकोट, विजयदुर्ग किल्ल्याला लोक आवर्जून भेट देत आहेत.
देवगड, मालवण आणि वेंगुर्ले या तीन तालुक्यांत पर्यटकांची मोठी संख्या पाहायला मिळत आहे. पर्यटक बोटिंग, स्कूबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, बॅक वॉटर बोटिंग, डॉल्फिन सफारी यांचा आनंद घेत आहेत.




























































