
नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने शिंदे गटाला फक्त 8 जागा देऊन बोळवण केल्याने शिंदेंच्या शिवसेनेत मोठा असंतोष उफाळून आला आहे. यातही 6 जागांवर भाजपने आपल्याच कार्यकर्त्यांना तिकीट दिले. मग 2 जागांवर युती कशासाठी केली, अशी विचारणा संतप्त शिवसैनिक करीत आहेत. यातच आता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज गोजे यांचा भाजपने पद्धतशीर गेम केल्याचे समोर आले आहे.
जिल्हाप्रमुख सूरज गोजे प्रभाग क्रमांक 20 मधून लढण्यास इच्छुक होते. प्रमुख पदाधिकारी असल्याने तिकिटे मिळेलच असे त्यांना वाटत होते. जिल्हाप्रमुख या नात्याने भाजपसोबत झालेल्या बैठका आणि सर्व वाटाघाटींमध्ये ते सहभागी होते. सोमवारी रात्री भाजपने 8 जागा देण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी 6 जागा भाजपचे उमेदवार लढतील अशी अट टाकली होती. त्यावर कोणीच समाधानी नव्हते. उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा नितीन गडकरी यांच्या घरी बैठक घेण्यात आली. मात्र तोडगा निघाला नाही. किमान शिंदे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱयांसाठी तरी जागा सोडा अशी विनंती करण्यात आली. मात्र तीसुद्धा भाजपने स्वीकारली नाही. भाजपचा प्रस्ताव कोणालाच पटला नाही. त्यामुळे आमदार कृपाल तुमाने, पूर्व विदर्भाचे संघटक किरण पांडव यांच्यासह सर्वजण बैठकीतून निघून गेले.

























































