>> तरंग वैद्य
`द ब्रोकन न्यूज’ वृत्त वाहिन्यांमधील चढाओढीची, प्रतिस्पर्धेची इत्यंभूत माहिती देणारी वेब सीरिज आहे. 10 जून 2022 मध्ये झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या मालिकेचे आठ भाग आले. `आवाज भारती’ आणि `जोश 24/7′ नावाच्या दोन वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून आपल्याला चॅनल वॉर दाखवण्यात आले आहे.
दूरदर्शन यायच्या अगोदर रेडिओवर आपण शांत सूरातील बातम्या ऐकायचो. नंतर आपण बातम्या बघायला लागलो, पण सूर तोच शांत. पुढे या क्षेत्रात खूप मोठ्ठी क्रांती घडली. बातम्यांचा सूर बदलला. वेगवेगळ्या बातम्यांप्रमाणे आवाजांचे चढ-उतार, बातम्यांना पूरक असे संगीत आले. थोडक्यात आज बातम्या व्यवस्थित फोडणी देऊन प्रसारित केल्या जातात.
बातम्या देणाऱ्या वाहिन्या ज्यांना आपण `न्यूज चॅनल’ म्हणतो. आधी एक-दोन होते आता त्यांची संख्या भरपूरच आहे आणि त्यामुळे त्यांच्यात इतर क्षेत्रांप्रमाणे प्रतिस्पर्धाही आहे. कोणाची अस्तित्व टिकवण्याची स्पर्धा, कोणाची `नंबर वन’ बनण्याची, तर कोणाची `नंबर वन’ची जागा टिकवण्याची स्पर्धा. हे वृत्तवाहिन्यांमध्ये रोज चालत असलेले युद्ध आहे, ज्याची प्रचीती आपल्याला बातम्या बघताना पदोपदी येत असते.
`द ब्रोकन न्यूज’ वृत्त वाहिन्यांमधील चढाओढीची, प्रतिस्पर्धेची इत्यंभूत माहिती देणारी वेब सीरिज आहे. 10 जून 2022 मध्ये झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या मालिकेचे आठ भाग आले. `आवाज भारती’ आणि `जोश 24/7′ नावाच्या दोन वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून आपल्याला चॅनल वॉर दाखवण्यात आले आहे. यात एक वाहिनी खऱया बातम्या दाखवणारी, नैतिकता जपणारी, समाजात काही चुकीचे घडत असल्यास बातमीच्या स्वरूपाने आपल्या वाहिनीवर दाखवून शासनापर्यंत पोहोचवणारी, पण साध्या बातम्या बघणारे कमी असल्यामुळे टीआरपीत कमी पडणारी, तर दुसरी वाहिनी अगदी साधी किरकोळ बातमीसुद्धा फुलवून, मीठ-मिरची लावून, फोडणी देऊन दाखवणारी थोडक्यात प्रेक्षकांना नेहमीच बातमीचे चमचमीत खाद्य पुरवणारी आणि त्यामुळे हिचा प्रेक्षकवर्गही मोठा. या वाहिनीच्या संपादकाचे ब्रीदवाक्यच मुळी `खबर को पहले अच्छे से पकाओ, फिर परोसो’ हे असल्यामुळे त्याच्या हाताखालचे पत्रकारही त्याच अनुषंगाने काम करत असतात.
सामाजिक मुद्दे, राजकीय मुद्दे, आर्थिक घडामोडी, अपराध… बातम्या सगळ्याच प्रकारच्या, पण त्यांच्याकडे बघण्याचा आणि त्या दाखवण्याचा दृष्टिकोन प्रत्येक वाहिनीचा वेगळा. अशा अनेक बातम्यांवरून `जोश 24/7′ आणि `आवाज भारती’चे दृष्टिकोन दाखवत कथा पुढे जाते व आपल्यालाही बातमीला फोडणी कशी द्यायची हे उमगते. अशीच एक बातमी `आवाज भारती’कडे येते ज्यातून त्यांना असं वाटतं की, हे कृत्य शासन चुकीचे करीत आहे आणि ते सिद्ध करण्यासाठी त्यांची कर्तबगार महिला पत्रकार पुरावा म्हणून काही गोपनीय शासकीय कागदपत्रे प्राप्त करण्यात यशस्वी होते. पण नंतर पकडली जाते आणि मग `जोश’ या बातमीला अशी फोडणी देतो की, या महिला पत्रकार राधा भार्गवला जेलमध्ये जावे लागते. आता पुढे काय ही उत्कंठा वाढवत पहिले आठ भाग संपतात.
`द ब्रोकन न्यूज-2′ आली आहे ज्यात राधा भार्गव जामिनावर सुटून बाहेर येते. तिची पुढची वाटचाल आणि `जोश’विरुद्धचे तिचे युद्ध दाखवत कथा पुढे सरकते. दिग्दर्शकाने मालिकेचा वेग कायम ठेवला आहे, त्याचबरोबर सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. `जोश 24/7’च्या मुख्य संपादक दीपांकर सान्यालच्या भूमिकेत जयदीप अहलावतने कमालीचा अभिनय केला आहे. नैतिक मूल्ये शून्य असणारा आणि फक्त आपला फायदा बघणारा माणूस त्याने उत्तम उभा केला आहे. आपणच हुशार हा अहंकार त्याच्या चेहऱयावर त्याने कायम ठेवला आहे आणि त्याचा माज त्याने देहबोलीतून दाखवून दिला आहे.
त्याच्या विरोधात `आवाज भारती’ची संपादिका आहे सोनाली बेंद्रे. नैतिक मूल्य जपणारी, पत्रकारितेची घसरती पातळी बघून चिंतित होणारी अमीना कुरैशी तिच्यात दिसते. कर्तबगार, निर्भीड महिला पत्रकार आणि न्यूज रूमच्या बैठकीत आपले मुद्दे ठामपणे मांडणारी राधा भार्गव झाली आहे श्रिया पिळगावकर. दीपांकर, अमीना आणि राधा या तिघांनी सर्वार्थाने आपली भूमिका जगत ही मालिका यशस्वी केली आहे.
– [email protected]
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)