
नागोठणे शहराचे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराजांचा पालखी सोहळा चैत्र कृष्ण प्रतिपदेला शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पालखी सोहळ्याची ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली असून माहेरवाशिणींच्या आगमनाने प्रत्येक आळीतील घरे गजबजून गेली आहेत.
गावाच्या पूर्वेकडील डोंगरावरील घरळीत असलेल्या जोगेश्वरी मातेने मुरावाडी येथील हिरू ताडकर यांना दृष्टांत दिल्यानंतर त्यांनी मूर्ती डोक्यावरून गावात आणली. त्यानंतर तीन तळ्याच्या मधोमध या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर पोवळे कुटुंबीयांच्या पूर्वजांच्या अंगात भैरीचे वारे आले. त्यांनी जोगेश्वरी ही माझी बहीण असून तिच्या शेजारी माझी प्रतिष्ठापना करा असे सांगितले. रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील भैरवनाथांच्या मूळ स्थानावरून सत्व आणून जोगेश्वरी मातेच्या शेजारी भैरवनाथ महाराजांची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यामुळे हे देवस्थान श्री जोगेश्वरी-भैरवनाथ देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र जैन, सचिव भाईसाहेब टके, उत्सव कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर, उपाध्यक्ष संतोष चितळकर आणि उत्सव कमिटीच्या मार्गदर्शनाखाली हा पालखी सोहळा होणार आहे.
पोवळे कुटुंबीय मानकरी
उद्योगधंद्यानिमित्त बाहेरगावी गेलेले नागोठणेवासी व माहेरवाशिणी या पालखी सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असतात. पालखीच्या स्वागतासाठी दारोदारी रांगोळ्या काढण्यात येतात. देवीची ओटी भरण्यासाठी प्रचंड गर्दी होते. पंचक्रोशीतील ग्रामस्थ या सोहळ्यासाठी उपस्थित असतात. जोगेश्वरी देवीचे वतनदार व मानकरी पोवळे कुटुंबीयांच्या हातून पूजा व आरती होते. त्यांच्या हातून देवतांचे मुखवटे पालखीत ठेवल्यानंतर हा पालखी सोहळा सुरू होतो. यावेळी अवघ्या नागोठणेनगरीत ‘हर हर महादेव’चा गजर होतो.



























































