नवी मुंबईत न्यूयॉर्कच्या धर्तीवर उभा राहणार देशातील सर्वात मोठा अरेना; सिडकोने केली निविदा प्रक्रिया सुरू

न्यूयॉर्क आणि लंडनच्या देशातील सर्वात मोठा अरेना नवी मुंबईत उभा करण्यासाठी सिडकोने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या आयकॉनिक मल्टिपर्पज इनडोअर लाईव्ह एन्टरटेनमेन्ट अरेनात २० हजार प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था असणार असून २५ हजार प्रवासी उभो राहू शकणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोल्फ कोर्स, इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्कपाठोपाठ सिडकोने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतल्याने सुनियोजित शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखी एक ओळख निर्माण होणार आहे.

देशभरात सध्या छोटे मोठे ३५ अरेना आहेत. त्यांची क्षमता दोन हजार ते १५ हजार प्रेक्षकांची आहे. कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये १५ हजार प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था आहे. दिल्ली आणि पाँडिचेरीमधील इंदिरा गांधी अरेनामध्ये प्रत्येकी १४ हजार ३४८ प्रेक्षक बसू शकतात. सिडकोने मात्र नवी मुंबईत सुमारे ४५ हजार प्रेक्षकांची क्षमता असलेला अरेना उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अरेना न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन इनडोअर अरेना आणि लंडन येथील ओ टू अरेना यांच्या धर्तीवर साकारण्यात येणार आहे. अरेनाच्या निर्मितीसाठी सिडकोने संबंधित संस्थांकडून अर्ज मागवले आहेत. त्यानुसार संस्थांना ९ ते ३१ डिसेंबरदरम्यान आपल्या निविदा सादर करता येणार आहेत.

आर्थिक क्रांतीचा पाया
नवी मुंबईला जागतिक दर्जाचे करमणूक केंद्र व उत्कृष्ट शहर म्हणून प्रस्थापित करण्याचा सिडकोला सार्थ अभिमान आहे. देशातील पहिला आयकॉनिक मल्टिपर्पज इनडोअर लाईव्ह एन्टरटेनमेन्ट अरेना उभारण्यासाठी सुरू करण्यात आलेली प्रक्रिया ही आगामी सांस्कृतिक आणि आर्थिक क्रांतीचा पाया आहे. या प्रकल्पाद्वारे जागतिक दर्जाची करमणूक देशवासींयासाठी खुली होऊन कलाकार, उद्योजक आणि स्थानिक समूहांकरिता व्यापक प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत. नवी मुंबईचे जागतिक नकाशावरील स्थान अधिक बळकट होणार आहे, अशी प्रतिक्रिया सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी व्यक्त केली आहे.

अरेनाची उभारणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपास करण्यात येणार आहे. शहरातील पायाभूत सुविधांचा विकास अत्यंत वेगाने होत असल्याने जागतिक पातळीवरील करमणूक कार्यक्रमांचे यजमानपद भूषवण्यासाठी नवी मुंबई सक्षम झाली आहे.