मुंबई मॅरेथॉनवर इथियोपियाचा झेंडा; ताडू अबाते डेमेने पुरुष गटात तर येशी चेकोलू महिला गटात विजेते

>> मंगेश वरवडेकर

गतवर्षी इथियोपियाला एकही स्पर्धा जिंकता आली नव्हती, मात्र यंदा त्यांनी मुंबई मॅरेथॉनवर आपला झेंडा फडकावला. पुरुष गटात ताडू अबाते डेमेने बाजी मारली तर येशी चेकोलूने महिला मॅरेथॉनमध्ये प्रथमच सोनेरी कामगिरी करण्याचा पराक्रम केला.  हिंदुस्थानी गटात कार्तिक करकेरा (पुरुष) आणि  संजीवनी जाधव (महिला) यांनी अव्वल स्थान संपादले.

विकासकामे पूर्ण झाल्यामुळे सुसाट झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये मुंबईच्या तापमानात गारवा असल्यामुळे शर्यतीत विक्रमी वेळ नोंदवली जाईल अशी अपेक्षा होती, पण धावपटूंना सर्वोत्तम वेळ देता आली नाही. पण ताडूने 2 तास 10 मिनिटांपेक्षा कमी वेळ देण्याची किमया साधली. या स्पर्धेवर नेहमीप्रमाणे केनियन, इथोपियन धावपटूंनीच वर्चस्व गाजवले. पण यंदा इथियोपियन धावपटूंची कॉलर टाइट होती. गेल्या वेळी त्यांच्या एकाही धावपटूला सोनेरी यश संपादता आले नव्हते, मात्र यंदा दोन्ही शर्यतींत दमदार वेळेत इथियोपियन धावपटूंनीच जिंकल्या. पुरुष गटात अव्वल स्थानासाठी आफ्रिकन धावपटूंमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. यात इथिओपिया, केनियासह एरिट्रिया आणि युगांडाचेही धावपटू होते. पण शेवटच्या टप्प्यात ताडूने लँगट, मेरहावी केसेटे आणि व्हिक्टर क्लिपलँगट या प्रतिस्पर्धी देशातील धावपटूंना मागे टाकत 2 तास 9 मिनिटे 55 सेकंदांत शर्यत जिंकली.

महिलांच्या मॅरेथॉनमध्ये सबकुछ इथियोपिया

यंदा महिलांच्या मॅरेथॉनमध्ये इथियोपियाच्या अव्वल धावपटूंचा सहभाग होता. अन्य देशांतील कमी धावपटूंनी या शर्यतीत भाग घेतला होता. त्यामुळे या पूर्ण मॅरेथॉनमध्ये दहापैकी नऊ धावपटू एकटय़ा इथियोपियाच्याच होत्या. अन्य देशातील धावपटूंचा नसलेला सहभाग पाहून धक्का बसला. या मॅरेथॉनमध्ये येशीने 2 तास 25 मिनिटे 13 सेकंद वेळेत शर्यत जिंकली तर पुढील आठ इथियोपियन धावपटूंनी 2 तास 37 मिनिटांपेक्षा कमी वेळ देत आपले वर्चस्व कायम राखले. हिंदुस्थानकडून संजीवनी जाधव ही दहावी ठरली. पण तिने हीच शर्यत 2 तास 49 मिनिटे 2 सेकंदांत शर्यत पूर्ण केली. म्हणजेच येशीने शर्यत जिंकली तेव्हा संजीवनी तब्बल चार किमी मागे होती.

एरिट्रियाचा मर्यादित सहभाग

गतवेळची मॅरेथॉन गाजवणाऱया पूर्व आफ्रिकन देश असलेल्या एरिट्रियाला यावर्षी विशेष काही करता आले नाही. त्यांच्या देशाचा सहभागही फार कमी होता. फक्त पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये  त्यांचा एक खेळाडू तिसऱया स्थानावर राहिला.

मुंबईचे रस्त्यावरचे स्पिरिट गायब

मुंबई मॅरेथॉनमध्ये धावपटूंचा सहभाग दिवसेंदिवस वाढतच चालला असला तरी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी भल्यापहाटे थंडीत कुडकुडत उभे राहणारे मुंबईचे स्पिरिट हळूहळू गायब होत असल्याचे चित्र आज प्रकर्षाने जाणवले. आज मुंबई मॅरेथॉनच्या शर्यत सुरू होण्याच्या म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेर मुंबईकरांची अत्यल्प गर्दी आयोजकांची धास्ती वाढवणारी होती. 69 हजारांपेक्षा अधिक स्पर्धक धावण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर उतरले, पण त्यांना चीअरअप करण्यासाठी मुंबईकर कुठे दिसलेच नाही. जे रेल्वेच्या मुख्यालयाबाहेर पाहायला मिळाले, तेच पेडर रोड, वरळी, प्रभादेवी तसेच वांद्रे-वरळी सी लिंकवरही दिसून आले. त्यामुळे मॅरेथॉनमध्ये ओसंडून वाहणारे मुंबईकरांचे स्पिरिट अचानक कुठे गायब झाले हा प्रश्न सर्वांना पडला आहे. पुढील वर्षभरात आयोजकांना या प्रश्नाचे उत्तर शोधून मुंबईकरांना रस्त्यावर उतरवण्याचे तंत्रही आत्मसात करावे लागणार आहे.

मुख्य मॅरेथॉन (पुरुष)

  1. ताडू अबाते डेमे (इथियोपिया) 2ः09ः55
  2. लिओनार्ड लँगट (केनिया) 2ः10ः10
  3. मेरहावी केसेटे (एरीट्रिया) 2ः10ः22
  4. गाडा गुडेटा(इथियोपिया) 2ः10ः49
  5. व्हिक्टर क्लिपलँगट (युगांडा) 2ः11ः02

मुख्य मॅरेथॉन (महिला)

  1. येशी चेकोलू (इथियोपिया) 2ः25ः13
  2. किडसन जेब्रेमेधिन (इथियोपिया)2ः27ः35
  3. गोज्जम एन्यू (इथिओपिया) 2ः28ः27
  4. बर्के डेबेले बेयेने (इथिओपिया) 2ः30ः22

5.मेदिना डेमे डेमिल्यू (इथिओपिया)2ः33ः02

मुख्य मॅरेथॉन (पुरुषहिंदुस्थान)

  1. कार्तिक करकेरा (हिंदुस्थान) 2ः19ः55
  2. अनिश मगर (हिंदुस्थान) 2ः20ः08
  3. प्रदीप चौधरी (हिंदुस्थान) 2ः20ः49
  4. क्रेर्स्त्जुन पाथॉ (हिंदुस्थान) 2ः22ः39
  5. इहोबोरलँग नाँगस्पंग (हिंदुस्थान)2ः24ः19

मुख्य मॅरेथॉन (महिलाहिंदुस्थान)

  1. संजीवनी जाधव (हिंदुस्थान) 2ः49ः02
  2. निरमाबेन ठाकोर (हिंदुस्थान) 2ः49ः13
  3. सोनम (हिंदुस्थान) 2ः49ः24
  4. श्यामली सिंह (हिंदुस्थान) 3ः03ः06
  5. भगवती डांगी (हिंदुस्थान) 3ः03ः16

मॅरेथॉन मूड

धावपटूंची भूक मिटवण्यासाठी मुंबईचे डबेवाले मदतीला

मुंबई मॅरेथॉनमध्ये आतापर्यंत ड्रीम रनमध्ये सहभाग घेत असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांनी यंदा आयोजकाच्या सहकार्याने थकूनभागून  शर्यत पूर्ण करणाऱया धावपटूंच्या उदरभरणाची जबाबदारी घेतली होती. तब्बल पाचशेपेक्षा अधिक डबेवाल्यांनी तीन ठिकाणी रिफ्रेशमेंट पॉइंटवर धावपटूंना स्नॅक्स वाटपाचे काम अत्यंत चोखपणे पार पाडले.

हिंदुस्थानची समाधानकारक कामगिरी

आधी हिंदुस्थानचे धावपटू मुंबई मॅरेथॉनच्या टॉप टेनमध्येही येत नव्हते. गतवेळी हिंदुस्थानच्या अनिश थापा आणि मान सिंग या दोघांनी सातवा आणि आठवा क्रमांक पटकावला होता. यंदा गतवर्षीची पुनरावृत्ती करता आली नसली तरी कार्तिक करकेरा आणि संजीवनी जाधव हे दहाव्या क्रमांकावर आले. तसेच करकेराला हिंदुस्थानच्या सर्वोत्तम वेळेच्या जवळपासही जाता आले नाही.

पिकनिक मूड अर्ध मॅरेथॉनपटू

ड्रीम रनमध्ये धावणारे सारेच पिकनिक मूडमध्ये असतात, पण आता अर्ध मॅरेथॉनमध्येही त्याच मूडमध्ये धावणाऱया धावपटूंची संख्या हजारात आहे. चालता बोलता फोटो सेशन्स करत-करत धावणारे पुरुष आणि महिला धावपटू आरामात शर्यत पूर्ण करत होते. या धावपटूंनी चार तासांत हसतखेळत 21 किमीचा टप्पा गाठला.

सर्वांना मिळाले मेडल्स

दोन वर्षांपूर्वी सहा तासांपेक्षा अधिक वेळ घेत 42 किमीचे अंतर गाठणाऱया शेकडो मॅरेथॉन धावपटूंना मेडल्सविना परतावे लागले होते. मात्र यावेळी त्या गोंधळाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रोकॅमने खबरदारी घेतली. त्यामुळे यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि शर्यत पूर्ण करणाऱया हौशी धावपटूंना गळ्यात मेडल्स घालून मिरवताना पाहायला मिळाले. गेल्या मॅरेथॉनमध्ये हजारो मेडल्सचे बॉक्स गहाळ झाले होते. त्यामुळे असंख्य धावपटूंना यशस्वीपणे शर्यत पूर्ण केल्यानंतरही निराश मनाने पदकाविना घरी परतावे लागले होते.