
राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत लावण्यात आलेले गुन्हे हटवल्यानंतर लडाखच्या हक्कांसाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी त्यांच्यावर मोदी सरकारने केलेल्या अन्यायाला वाचा पह्डली. मला कोणत्याही माहितीशिवाय तुरुंगात डांबण्यात आले, माझ्या पत्नीवरही पहारा होता. मला जवळपास 10 दिवस कोणालाही भेटू दिले नाही. ही सगळी एक भयकथा होती, असे सांगत वांगचूक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याच वेळी माझी तुरुंगातून सुटका होणे यापेक्षा लडाखच्या जनतेच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत, अशी भूमिका वांगचूक यांनी मांडली.
सोनम वांगचूक आणि त्यांची पत्नी गीतांजली यांनी दिल्लीत आज पत्रकार परिषद घेऊन अटकेपासून सुटकेपर्यंत झालेल्या अन्यायाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले, मी 12 महिने तुरुंगात राहण्याची मानसिक तयारी केली होती. मला अचानक घरातून उचलून कोणत्याही माहितीशिवाय तुरुंगात डांबले. जवळपास 10 दिवस मला वकील किंवा कुटुंबातील कोणालाच भेटू किंवा संपर्क करू दिला नाही. माझ्या पत्नीला नजरपैदेत ठेवले होते. त्याच्या घराबाहेर मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. तिला पत्रकारांनादेखील भेटू दिले नाही. ती कशीतरी दिल्लीत पोहोचली, न्यायालयात धाव घेतली. तिच्या मागे कार आणि मोटरसायकस्वार लोक पाठलाग करत होते. हे सगळे चित्रपटासारखे होते. वकिलांपर्यंत कोणतीही माहिती पोहोचवणे अतिशय कठीण होते. हे सर्व एखाद्या भयकथेसारखे होते. मी उपोषणाला बसणार नव्हतो, मात्र परिस्थितीमुळे हे पाऊल उचलावे लागले, असे वांगचूक म्हणाले. रासुका हटविल्यानंतर 170 दिवसांनी वांगचूक यांची गेल्या आठवडय़ात तुरुंगातून सुटका झाली होती.
चर्चेचा मार्ग खुला, लढा लडाखसाठी
सोनम वांगचूक यांनी सुटकेला एक सकारात्मक पाऊल म्हटले असून आता चर्चेचा मार्ग खुला झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, ही विनविन परिस्थिती आहे. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा हेतू केवळ चर्चा सुरू करणे, हाच होता. आता मी लडाखला परत जाऊन तेथे स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करणार आहे. लडाखच्या जनतेच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत, असे वांगचूक यांनी स्पष्ट केले.

























































