अभिनेत्री रश्मिका मंदाना, आलिया भटपासून ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेदेखील डीपफेक व्हिडीओचा बळी ठरले होते. एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमतेद्वारे तयार केलेल्या या डीपफेक व्हिडीओमुळे अनेकांची नाहक बदनामी झाली. या पार्श्वभूमीवर डीपफेकला आळा घालण्यासाठी मोदी सरकारने डिजिटल इंडिया विधेयक आणण्याचा निर्णय घेतला आहे. हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांत मांडताना एआय तंत्रज्ञानाच्या अधिक चांगला वापर आणि पद्धतींवर चर्चा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. हे विधेयक मंजूर करण्यासाठी सरकार विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करू शकते.
26 जूनपासून सुरू होणाऱ्या 18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात नवीन खासदारांचा शपथविधी आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होईल. अधिवेशनात अर्थसंकल्पाशिवाय डिजिटल इंडिया या महत्त्वाच्या विधेयकावर दीर्घ चर्चा होऊ शकते. सोशल मीडियावर प्रसिद्ध होणाऱ्या व्हिडीओंवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कायद्याची तरतूद या विधेयकात करण्यात येऊ शकते, असेही सूत्रांनी म्हटले आहे. सरकार सोशल मीडियावरील बनावट व्हिडीओंवर नियंत्रण ठेवण्यासाठी विधेयक आणण्याची तयारी करत असल्याचे तत्कालीन माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गेल्या वर्षी संसदेच्या अधिवेशनादरम्यान म्हटले होते.
कोण बळी पडले होते डीपफेकला
तेलंगणा काँग्रेस आणि मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अमित शहा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यात ते एससी-एसटी आणि ओबीसीचे आरक्षण संपवण्याबाबत बोलताना दिसले होते. पीटीआयच्या फॅक्ट चेक युनिटने सांगितले की, मूळ व्हिडीओमध्ये अमित शहा यांनी तेलंगणातील मुस्लिमांसाठी असंवैधानिक आरक्षण हटवण्याबाबत सांगितले होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा स्कायवॉर्ड एव्हीएटर क्वीस्ट गेमिंग ऍपचे प्रमोशन करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओफेक असल्याचे सचिनने स्वतः नंतर उघड केले होते. अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि आलिया भटचाही डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
असे असतील नवे नियम
बनावट सामुग्री आढळताच कुणीही एफआयआर दाखल करू शकतो. पीडित आणि त्याच्या वतीने नियुक्त केलेल्या व्यक्तीलाही गुन्हा दाखल करण्याचा अधिकार
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांकडून शपथ घेतली जाईल की, डीपफेक सामग्री पोस्ट करणार नाही. प्लॅटफॉर्म त्यांच्या वापरकर्त्यांना यासंदर्भात अलर्ट जारी करतील.
डीपफेक कंटेंट 24 तासांच्या आत काढून टाकावा लागेल. कंटेंट अपलोड करणाऱ्या युजरचे अकाऊंट बंद करावे लागील आणि अन्य प्लॅटफॉर्मची माहिती द्यावी लागेल, जेणेकरून आरोपी तेथे खाते तयार करू शकणार नाही.