कोल्हापुरात उपोषणकर्ते शिक्षकांची तब्येत खालावली, उपोषण मागे घ्या; शिक्षणमंत्र्यांचा आंदोलकांना फोन

तब्बल एक महिन्याहून अधिक दिवस संपूर्ण राज्यात अंशतः तसेच विनाअनुदानित शिक्षकांचे वाढीव टप्प्यासाठी तसेच प्रलंबित प्रश्नांसाठी आंदोलन सुरू आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर येथे गेले सात दिवस आमरण उपोषण सुरू आहे. आज उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असून, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. दरम्यान, शिक्षणमंत्री केसरकर यांचा आंदोलकांना फोन आला असून, त्यांनी उपोषण स्थगित करण्याची विनंती केल्याचे आंदोलकांनी सांगितले

सभागृहात वाढीव टप्प्याची घोषणा होऊन येत्या 12 सप्टेंबरला दोन महिने होत आहेत. ढीव टप्प्याचा शासननिर्णय निर्गमित व्हावा, अशी मागणी कृती समितीकडून होत आहे. उपोषणस्थळी खासदार, आमदार भेट देऊन जात आहेत. यापैकी काल आमदार सतेज पाटील यांनी भेट देत आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत, असे सांगितले. तर, आज खासदार धैर्यशील माने यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना फोन करून शिक्षकांच्या आंदोलनाविषयी कळविले. सरकार शिक्षकांबाबत सकारात्मक असून, काही दिवसांतच शासननिर्णय निघेल, असे सांगितले.

आज दुपारी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा जगदाळे सर यांना फोन आला. ‘आपण आमरण उपोषण मागे घ्यावे, टप्पावाढीबाबतची फाइल उद्या अर्थ विभागाकडे पाठवत आहे. त्यानंतर येणाऱया मंत्रिमंडळ बैठकीत ती येईल. मी लवकरच आदेश काढण्यासाठी प्रयत्नशील आहे,’ असे त्यांनी सांगितले. मंत्री केसरकरांच्या विनंतीला मान देऊन फक्त ज्युस घेण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.

यावेळी मराठवाडय़ाचे कृती समितीचे कार्याध्यक्ष वैजनाथ चाटे, महेंद्र वाघमारे, जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरणे, सुभाष खामकर, अनिल ल्हायकर, मच्छिंद्र जाधव, केदारी मगदुम, भानुदास गाडे, सावंता माळी, जयदीप चव्हाण, शिवाजी घाटगे, अविनाश पाटील, अरविंद पाटील, उत्तम जाधव, राजू भोरे, भानुदास गाडे, रामचंद्र काळेल, संदीप काळे, भाग्यश्री राणे, जयश्री पाटील, गौतमी पाटील, स्मिता उपाध्ये, सीमा कागवाडे आदी उपस्थित होते.