मोदी सरकारचे घूमजाव, तुर्कीच्या विमानांना सहा महिन्यांची मुदतवाढ

ऑपरेशन सिंदूर नंतर तुर्की विमान कंपनीवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या मोदी सरकारने अवघ्या तीन महिन्यांत घूमजाव केले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी या कंपनीसोबतच्या विमान कराराला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

या कंपनीसोबतचे करार तीन महिन्यांत संपवा, अशी सक्त ताकीद मोदी सरकारने इंडिगो एअर लाइन्ससला दिली होती. त्यानुसार 31 ऑगस्ट 2025 रोजी हे करार संपुष्टात येणार होते. मात्र या कंपनीच्या दोन विमान वापरा संदर्भातील कराराला अजून सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती इंडिगोने केली होती. ती विमान वाहतूक महासंचालकांनी मान्य केली.

महत्त्वाचे म्हणजे तुर्की कंपनीच्या उप कंपनीसोबत अजून पाच विमाने भाडय़ाने घेण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद महासंचालक कार्यालयाने केली आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर तुर्की कंपनीविरोधात सोशल मीडियावर प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला होता.

पाकिस्तानला ड्रोन दिल्याचा आरोप

पाकिस्तानने हिंदुस्थावर केलेल्या ड्रोनहल्ल्यात वापरले गेलेले ड्रोन हे तुर्कीचे होते. याची गंभीर दखल घेत मोदी सरकारने या कंपनीसोबतचे करार रद्द करण्याचे फर्मान जारी केले होते.

तुर्कीला भेट देणाऱ्यांची संख्या घटली

गेल्या वर्षी तब्बल 38 हजार हिंदुस्थानी तुर्कीला पर्यटनाला गेले होते. यावर्षी ही संख्या सुमारे 24 हजारांवर आली आहे.