
महाराष्ट्रासह आजूबाजूच्या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातारा जिह्यातील श्री तीर्थक्षेत्र पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांची यात्रा 14 ते 24 डिसेंबर दरम्यान साजरी होत आहे. यामध्ये सर्वांत महत्त्वाचा श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सव 18 डिसेंबर रोजी होणार आहे. या यात्रेसाठी पुसेगावनगरी सज्ज झाली आहे.
पुसेगावच्या सेवागिरी यात्रेला दरवर्षी लाखो भाविक हजेरी लावत असतात. त्यातही रथोत्सवादिवशी या ठिकाणी श्रद्धा आणि भक्तीचा महापूर पाहायला मिळतो. ग्रामीण संस्कृती, परंपरा, श्रद्धा, क्रीडा आणि व्यापार यांची एकत्रित पर्वणी म्हणून ही यात्रा ओळखली जाते. यात्रेदरम्यान होणाऱया बैलगाडा शर्यती, खिल्लार बैल बाजार, कृषी प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा तसेच हजारो व्यापाऱ्यांची उपस्थिती, यामुळे कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे ही यात्रा खऱया अर्थाने ग्रामीण भागाची अर्थवाहिनी ठरते.
क्रीडा स्पर्धांची पर्वणी
यात्रेतील क्रीडा कार्यक्रम तरुणांसाठी विशेष आकर्षण ठरतात. यावर्षी भव्य क्रिकेट सामने, अखिल भारतीय शूटिंग व्हॉलीबॉल, राज्यस्तरीय कबड्डी, श्री सेवागिरी मॅरेथॉन स्पर्धा, बँड महोत्सव, श्वान शर्यत, खिल्लार जनावरांचे प्रदर्शन असे अनेक उपक्रम श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टकडून आयोजित करण्यात आले आहेत.
जिलेबी, फरसाण खास आकर्षण
श्री सेवागिरी यात्रेचे आणखी एक अविस्मरणीय आकर्षण म्हणजे गरमागरम तारेसारखी जिलेबी आणि खमंग फरसाण. भाविक व यात्रेकरू या पदार्थांचा जिलेबीच्या दुकानात आस्वाद घेत गप्पांचा फड रंगवताना दिसतात. तसेच महाराष्ट्रातून आलेले भाविक व यात्रेकरू मोठय़ा प्रमाणावरती जिलेबी व फरसाण खरेदी करून घरी नेत असतात.
श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी लाखो भाविक येणार असून, त्यांच्यासाठी पाणी, वीज, आरोग्य सुविधा, स्वच्छता, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. ट्रस्ट, ग्रामपंचायत आणि प्रशासन एकत्र येऊन यात्रेचे आयोजन अधिक सुकर करण्यासाठी कार्यरत आहे.
– संतोष वाघ, चेअरमन, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, पुसेगाव




























































