
जागतिक राजकारण व व्यापारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रिक्स’ची धुरा हिंदुस्थानच्या खांद्यावर आली आहे. येत्या 1 जानेवारीपासून हिंदुस्थान औपचारिकरीत्या ही जबाबदारी स्वीकारणार आहे. अमेरिकेने जगावर लादलेले टॅरिफ वॉर आणि ट्रम्प यांच्या आक्रमक व्यापारी धोरणांच्या काळात ‘ब्रिक्स’चे नेतृत्व करताना हिंदुस्थानची कसोटी लागणार आहे.
‘ब्रिक्स’ समूहाचे अध्यक्षपद सध्या ब्राझिलकडे आहे. त्याआधी ते रशियाकडे होते. आता ही बॅटन हिंदुस्थानकडे सोपवण्यात आली आहे. ट्रम्प सत्तेवर आल्यापासून ब्रिक्स देशांवर दबाव वाढला आहे. डॉलरला पर्यायी चलन उभे करण्याच्या प्रयत्नात असलेल्या देशांना ट्रम्प लक्ष्य करत आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेशी संबंध सुरळीत ठेवतानाच एक पर्यायी व्यासपीठ म्हणून ‘ब्रिक्स’ला पुढे आणण्यासाठी हिंदुस्थानला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.




























































