डांबरी आणि सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांना लागणाऱया साहित्यांच्या मिश्रणातून ‘सिमेंट ग्राऊटेड बिटूमिनस मॅकेडम’ या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सावर्जनिक बांधकाम विभागाने प्रायोगिक तत्त्वावर महाबळेश्वर तालुक्यात एक किलोमीटर रस्ता तयार केला आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर या तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण महाराष्ट्रात खड्डेमुक्त रस्ते तयार केले जातील, अशी माहिती सावर्जनिक बांधकामच्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली. यावेळी महाबळेश्वरचे उपविभागीय अभियंता अजय देशपांडे उपस्थित होते.
सावर्जनिक बांधकाम विभागाने नवीन रस्त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला असून, या नव्या तंत्रज्ञानाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वरमध्ये दरवर्षी 225 ते 260 इंच पाऊस पडतो. या पावसामुळे तालुक्यातील डांबरी रस्ते सतत खराब होतात. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडतात. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मोठा खर्च येतो. शासनाकडून त्या प्रमाणात निधीही उपलब्ध होत नाही. महाबळेश्वर पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील ठिकाण आहे. या भागात सिंमेट रस्त्यांमुळे उष्णतेत वाढ होते. त्यामुळे असे रस्ते पर्यावरणास घातक ठरत आहेत. डांबरी व सिमेंट रस्त्यांच्या फायदा-तोटय़ांचा विचार करून व दोन्ही पद्धतीचा समतोल राखून बांधकाम विभागाने पर्यावरणपूरक असे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानानुसार डांबरी रस्त्यावर सिमेंट व इतर केमिकलचा वापर करून दीड ते दोन इंचाचा थर टाकला जातो. सिमेंट व केमिकल पातळ असल्याने ते डांबरी रस्त्यातील खडीमधून जमिनीपर्यंत पोहोचते आणि रस्ता तयार होतो.
मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वरपासून दहा किमी अंतरावर भीमनगरजवळ महाबळेश्वर-तापोळा या प्रमुख जिल्हा मार्गावर एक किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी महाबळेश्वरचे उपविभागीय अभियंता अजय देशपांडे, नवीन तंत्रज्ञान विकसित करणारे मॅग्रीक्रिट सोल्युशनचे डॉ. सुमन चक्रवर्ती, उद्योजक अरुण देसाई उपस्थित होते.
नवीन रस्त्याचा प्रयोग यशस्वी झाला तर याच तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण महाराष्ट्रात असे पयार्वरणपूरक रस्ते तयार केले जातील. खड्डेमुक्त रस्ते देण्याचा महाराष्ट्राचा संकल्प या नवीन तंत्रज्ञानाने पूर्ण होईल.
– अतुल चव्हाण, मुख्य अभियंता, पुणे विभाग