अमली पदार्थांच्या रॅकेटला आळा घालण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना; जबाबदारी विशेष पोलीस महानिरीक्षकांवर, गृहखात्याकडून 22 कोटींचा निधी

राज्यातील अमली पदार्थांच्या रॅकेटला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने अमली पदार्थविरोधी टास्क पर्ह्सची स्थापना करण्याचा निर्णय घेतला असून या पर्ह्सच्या स्थापनेसाठी राज्याच्या गृहखात्याने 22 कोटी 36 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अमली पदार्थांची विक्री व सेवनाच्या मुद्दय़ावरून सर्वपक्षीय सदस्यांनी चिंता व्यक्त केली होती. कायदा व सुव्यवस्थेवरील चर्चेत भाग घेताना सदस्यांनी अमली पदार्थांच्या रॅकेटप्रकरणी सत्ताधाऱयांना जबाबदार धरले होते. एका वर्षात अमली पदार्थाच्या विक्रीत 481 टक्क्यांनी वाढ झाल्याची आकडेवारी विधिमंडळात सादर झाली होती. काही महिन्यांपूर्वी 30 दिवसांच्या विशेष कारवाईत 140 कोटी 20 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. विधिमंडळातील या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमली पदार्थाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी टास्क पर्ह्सची स्थापना करण्याची घोषणा केली होती.

या टास्क पर्ह्ससाठी 346 नवीन पदे निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामध्ये पोलीस उपमहानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक,  पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस शिपाई, चालक अशा विविध पदांचा समावेश आहे.