स्पॉटबॉय ते राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता, ऋषभ शेट्टीची संघर्षमय कथा

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यात ‘कांतारा’साठी ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. ऋषभ आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला असला तरी यश मिळविण्यासाठी त्याला तब्बल 20 वर्षे संघर्ष करावा लागला. स्पॉटबॉय ते राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता असा त्याचा प्रवास रंजक आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबातील ऋषभला शिक्षणासाठी आणि उदरनिर्वाहासाठी पालकांना त्रास द्यायचा नव्हता म्हणून त्याने कधी पाण्याच्या बाटल्या विकल्या, तर कधी हॉटेलमध्ये नोकरी केली. पण त्याचे मन फक्त अभिनयात रमायचे. पुढे त्याने चित्रपट दिग्दर्शनाचा डिप्लोमा करायचे ठरवले.

बंगळुरूच्या सरकारी फिल्म अँड टीव्ही इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. ऋषभने एका चित्रपटात स्पॉटबॉय म्हणून सुरुवात केली. पुढे ‘सायनाइड’ या कन्नड चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. 2012 साली आलेल्या ‘तुघलक’मध्ये त्याला छोटी पण महत्त्वाची भूमिका मिळाली. 2016 मध्ये ऋषभने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. त्याने बनवलेला ‘किरिक पार्टी’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. 2018 मध्ये ऋषभने बनवलेल्या ‘सरकारी हिरिया प्राइमरी स्कूल, कासरगोडू’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 2019 मध्ये, ऋषभने ‘बेल बॉटम’ चित्रपटाद्वारे मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. अशाप्रकारे त्याला नायक म्हणून ब्रेक मिळण्यासाठी तब्बल 13 कर्षे काट पाहावी लागली.

‘कांतारा’मुळे रातोरात नशीब बदलले

‘कांतारा’ चित्रपटाची कल्पना त्याला लॉकडाऊनदरम्यान सुचली. हाच चित्रपट त्याच्यासाठी गेम चेंजर ठरला. ‘कांतारा’ने बॉक्स ऑफिसवर तब्बल 415 कोटींची कमाई केली.