पिळदार शरीर, अॅब्ससाठी तरुण जीममध्ये घाम गाळतात. मात्र, अल्पावधीतच पिळदार शरीरयष्टी कमविण्याच्या नादात काही तरुण स्टेरॉइडचा वापर करतात. आधुनिक व्यायामशाळांमध्ये असलेले स्टेरॉइडचे लोण’ तालमीपर्यंत पोहचले आहे. काही पैलवान पिळदार शरीरयष्टीसाठी स्टेरॉइडचा आधार घेत असून, त्याचा त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे. नुकत्याच पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये हिंदुस्थानची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला अवघे १०० गॅम वजन वाढल्याने स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. मात्र, त्याच कुस्तीतील काही तरुण वजन वाढवण्यासाठी स्टेरॉइडचा आधार घेऊ लागले आहेत.
व्यायाम आणि प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन करून स्नायूंचा आकार वाढवण्याऐवजी काही तरुण स्टेरॉइडचा आधार घेत आहेत. काही शहरांतील जीममध्ये स्टेरॉइड अनधिकृतपणे तरुणांना दिले जात असल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
‘बॉडी शो’च्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी जिममधील तरुण स्टेरॉइडचा वापर सर्रास करतात. पैलवान मंडळी पारंपरिक व्यायामाबरोबर कसदार आहाराला प्राधान्य देतात. मात्र, जीमप्रमाणे पिळदार शरीरयष्टी मिळवण्यासाठी आता तालमीमध्ये व्यायाम करणारे काही तरुण पैलवानदेखील स्टेरॉइडचा वापर करू लागले आहेत. कोणाच्या तरी चुकीच्या सल्ल्याने घातक स्टेरॉइड, इंजेक्शन, गोळ्या, पावडरच्या आहारी जाऊ लागले आहेत. या स्टेरॉइडच्या इंजेक्शनसाठी तरुण मंडळी १५ ते २० हजार रुपये मोजत आहेत. स्टेरॉइडच्या चुकीच्या वापरामुळे अनेक तरुणांना जीव गमवावा लागत असल्याच्या घटनादेखील घडलेल्या आहेत.
स्टेरॉइडबाबतचे गैरसमज
स्टेरॉइडच्या वापरामुळे झटपट शरीरयष्टी तयार होते. याच्या वापरामुळे दम लागत नाही. व्यायाम अधिक काळ करता येतो. अंगातील शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे अनेकजण हे कुस्तीसाठी किंवा तालमीत व्यायाम करताना स्टेरॉइडचा वापर करतात. कुस्तीमध्ये डावपेच अत्यंत महत्त्वाचे असतात. हे डावपेच स्टेरॉइड घेतल्यामुळे नाही, तर योग्य तंत्र आत्मसात करूनच शिकता येतात. त्यामुळे तरुण पैलवानांनी कष्ट आणि योग्य आहारावर भर द्यावा, असे जिम ट्रेनर, कुस्तीपटू ललित शिवले यांनी सांगितले.
स्टेरॉइड घेणे टाळाच
वाढवण्यासाठी शॉर्टकट म्हणून स्टेरॉइडचा वापर केला जातो. स्टेरॉइडच्या वापरामुळे रोग प्रतिकारक क्षमता कमी होते. त्यामुळे भविष्यात त्याचे विपरित परिणाम भोगावे लागू |शकतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, मोतीबींदू यासह अन्य गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे तरूणांनी स्टेरॉइडचा वापर टाळावा. शरिरयष्टी बनवण्यासाठी असलेल्या इतर पर्यायांचा वापर करावा. तज्ज्ञ डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांच्या सल्ला घेऊनच डाएट प्लॅन’ तयार करावा, असा सल्ला आहार तज्ज्ञ डॉ. पुनम शहा यांनी दिला