
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरण कामांतर्गत चिपळूण हद्दीतील रखडलेल्या कामांना अखेर चांगलाच वेग मिळू लागला आहे. विशेषतः परशुराम घाटात दरडींच्या धोक्याला अटकाव करण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या आणि पावसाळ्यात ढासळलेल्या गॅबियन वॉलचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. तसेच उड्डाणपुलाच्या स्लॅबसह जोडरस्त्यांच्या कामांतही गती आली असून पुढील सहा महिन्यांत ही प्रमुख कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे महामार्ग विभागाकडून सांगण्यात येत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे ५.४० किलोमीटरचा परशुराम घाट हा कोकण प्रदेशातील महत्त्वाचा घाट मार्ग मानला जातो. चौपदरीकरणाच्या कामासाठी हा घाट चिपळूण व खेड अशा दोन टप्प्यांमध्ये विभागण्यात आला. मात्र, घाट तोडफोडीपासूनच या कामांना वारंवार विघ्नांचा सामना करावा लागला. कामादरम्यान अपघाती मृत्यू, सतत दरडी कोसळणे, संरक्षणभिंतींना तडे जाणे अशा घटनांमुळे चौपदरीकरणाचा वेग लक्षणीयरीत्या कमी झाला होता.
दरडीचा धोका लक्षात घेत केंद्र सरकारने टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (टीएचडीसीएल) यांची विशेष नेमणूक करून घाटाचे सखोल सर्वेक्षण करवून घेतले. त्यांच्या सूचनेनुसार कोट्यवधींच्या निविदेद्वारे डोंगराला जाळ्या बसविणे व गॅबियन वॉल उभारणीचे काम सुरू केले गेले. मात्र मागील मे महिन्यात पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचे नियोजन असतानाच अनपेक्षितरीत्या मुसळधार पाऊस कोसळल्याने कामांवर पाणी फिरले. अनेक ठिकाणी गॅबियन वॉल कोसळल्याने महामार्ग विभागाने सर्व कामे तात्पुरती स्थगित करत घाटात केवळ एकेरी वाहतूक सुरू ठेवली होती. पावसाच्या पाण्यामुळे उर्वरित बांधकामाचे नुकसान होऊ नये म्हणून काही ठिकाणी प्लास्टिकचे आच्छादनही तात्पुरते टाकण्यात आले होते.
पावसाळा संपताच आता घाटातील अपूर्ण कामांना वेग देण्यात आला आहे. सुधारित रचनेनुसार गॅबियन वॉल उभारणी पुन्हा सुरू झाली असून ती जलद गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर उड्डाणपुलाच्या स्लॅबचे ८०० मीटरहून अधिक काम पूर्ण झाले असून जोडरस्त्यांचे कामही प्रगतीपथावर आहे. या सर्व कामांमुळे परशुराम घाटातील वाहतूक पूर्ववत आणि सुरक्षित करण्याचा प्रयत्न महामार्ग व संबंधित कंत्राटदार कंपनीकडून केला जात आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये ही महत्त्वाची कामे पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, कोकणवासीयांची अनेक वर्षांची प्रतीक्षा लवकरच संपण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
महामार्गावरील मोऱ्यांचे काम नियोजित आराखड्यानुसार करण्याच्या सूचना
शहरातील प्रांत कार्यालयाच्या मागील भागातून येणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर मोन्यांचे काम सुरू आहे. मात्र हे काम समपातळीचा विचार न करता होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते नित्यानंद भागवत यांनी संबंधित विभागांकडे केली. त्यानंतर हे काम तात्पुरते थांबवण्यात आले. याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना नियोजित आराखड्यानुसारच काम करण्याच्या स्पष्ट सूचना केल्या. अधिकाऱ्यांनी सोमवारी ठेकेदार कंपनीशी चर्चा केली असून हे काम प्राथमिक टप्प्यात असून नियमानुसारच पूर्ण केले जाईल, असे कंपनीने सांगितले आहे.


























































