…तर लॉकडाऊन टाळता येणार नाही! महापालिका आयुक्तांचा इशारा

लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे काही म्हणाले ते योग्यच आहे. लोकांनी शिस्त पाळायला हवी, हजारोंच्या गर्दीत जाणे टाळायला हवे. मास्क वापरणे गरजेचे असून लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमात गर्दी न केल्यास लॉकडाऊनची वेळ येणार नाही. परंतु मुंबईत सध्या वेगळंच चित्र दिसून असून हजारोंच्या संख्येने लोक विनामास्क फिरायला लागले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन टाळता येणार नाही, मुंबईकरांसाठी पुढील 8 ते 15 दिवस फार महत्वाचे असल्याचा इशारा सोमवारी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिला.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून विनामास्क फिरणाऱयांची संख्या वाढत असून याबाबत चिंता व्यक्त करताना मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी हा इशारा दिला. आपल्याकडे दोन व्हिडीओ आले आहेत. एका व्हिडीओत चौपाटीवर हजारोंच्या संख्येने मुंबईकर बाहेर पडले असून तिथे विनामास्क फिरणाऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. तर दुसऱया एका व्हिडीओत लग्नात मोठय़ा प्रमाणात गर्दी केली असून त्यातही अनेकांनी मास्क घातलेला नाही. पबमध्येदेखील अशीच परिस्थिती असून अनेकांवर गुन्हा दाखल केला आहे. हा सगळा बेशिस्तपणा असल्याची टीकादेखील यावेळी त्यांनी केली.

रुग्णवाढीला ब्रेक

राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या रुग्णवाढीला सोमवारी अखेर हलका ब्रेक मिळाला. सोमवारी दिवसभरात एपूण 5 हजार 210 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर रविवारी एका दिवसात सात हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले होते. राज्यात वाढत असलेल्या या रुग्णवाढीला ब्रेक मिळाल्याचे वृत्त तात्पुरते दिलासादायक ठरले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या