कश्मीरमध्ये तीन दिवसांत तिसरा हल्ला, एक जवान शहीद

 दिल्लीत एनडीएचे सरकार शपथ घेत असतानाच कश्मिरात अतिरेक्यांनी वैष्णोदेवीला जाणाऱया हिंदू भाविकांच्या रक्ताचा सडा पाडला होता. ही घटना ताजी असतानाच गेल्या 24 तासांत पुन्हा अतिरेक्यांनी डोडा आणि कठुआ येथे जोरदार हल्ला चढवला. कठुआत लष्कराने दोन अतिरेक्यांचा खात्मा केला. डोडा जिल्हय़ात लष्कराच्या चेकपोस्टवर अतिरेक्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या चकमकीत एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे.

जम्मू-कश्मिरातून कलम 370 हद्दपार केल्यानंतर तेथील दहशतवाद संपला असल्याचा दावा मोदी सरकारने केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनीही कश्मिरात शांतता नांदत असल्याची फुशारकी मारली होती. परंतु रियासी, डोडा आणि कठुआतील अतिरेकी हल्ल्यांनी हा दावा फोल ठरवला आहे.

रियासीतील भाविकांच्या बसवरील गोळीबाराची घटना अजून ताजी असतानाच काल रात्री डोडा जिल्हय़ातील छत्रगला येथे असलेल्या लष्कराच्या चेकपोस्टवर अतिरेक्यांनी गोळीबार केला. अतिरेक्यांच्या गोळीला जवानांनी गोळीनेच उत्तर दिले. या चकमकीत पाच जवान आणि लष्कराचा एक अधिकारी गंभीर जखमी झाला. अतिरेक्यांनी दुसरा हल्ला कठुआ जिल्हय़ातील हिरा नगर येथे केला. अतिरेकी लपल्याच्या सूचनेवरून या भागात शोधमोहीम राबवण्यात येत होती. लष्कराने आपल्याला चोहोबाजूने घेरल्याचे लक्षात येताच अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. लष्करानेही त्याला तडाखेबंद प्रत्युत्तर दिले.

गोळीबारात ठार झालेल्या एका अतिरेक्याचा मृतदेह रात्रीच आढळला. दुसऱया अतिरेक्याचा खात्मा आज सकाळी करण्यात आला. काही अतिरेकी जंगलात पळून गेले. घटनास्थळावरून मोठय़ा प्रमाणावर शस्त्रास्त्र, दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

अतिरेक्यांशी उडालेल्या धुमश्चक्रीत जी.डी. कबीरदास हा जवान शहीद झाला. कबीरदास छिंदवाडा येथील रहिवाशी असून त्यांचे पार्थिव गुरुवारी येणार आहे. लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रियासी हल्ल्यातील संशयिताचे रेखाचित्र जारी

रियासी पोलिसांनी सोमवारी पोनी भागात भाविकांच्या बसवर झालेल्या हल्ल्यातील संशयिताचे रेखाचित्र जारी करण्यात आले आहे. या दहशतवाद्याबद्दल माहिती देणाऱयाला 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. प्रत्यदर्शींच्या चौकशीच्या आधारे पोलिसांनी संशयित दहशतवाद्याचे रेखाचित्र जारी केले आहे.