
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी डोंगराएवढे भराव टाकल्याने गावांना, शहरांना महापुराचा धोका बसणार आहे. शेतात 4-5 महिने पाणी साठून राहिल्याने शेती, शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत. शक्तिपीठसाठी 65 हजार कोटी रुपयांचा जादा खर्च दाखवला आहे. रस्त्याच्या प्रक्रियेत कमालीची गुप्तता पाळली आहे. आता, रस्त्यासाठी जमीन मोजणीसाठी कोणी आले तर त्यांना तुडवून हाणा, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
‘शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा’, या मागणीसाठी ईश्वरपूर तहसील कार्यालयावर राजू शेट्टी, भारत पाटणकर, धनाजी गुरव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. श्रमिक मुक्ती दल, मराठा क्रांती मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, दलित महासंघ, प्रहार संघटना, बळीराजा शेतकरी संघटना आदी पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. मागण्याचे निवेदन तहसीलदार सारिका रासकर यांना देण्यात आले.
शेट्टी म्हणाले, शक्तिपीठ महामार्गासाठी 124 कोटी रुपये प्रतिकिलो मीटर खर्च आहे. इतर रस्त्यांची तुलना करता 65 हजार कोटी रुपये अधिक खर्च दाखवला आहे. सरकारला जादा पैशातून 2029 ची निवडणूक लढवायची आहे. मतासाठी 5 ते 7 हजार रुपयेदेखील वाटले जातील, असा हल्लाबोल त्यांनी केला.
























































