हजारो कंत्राटी डॉक्टर, कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात, दोन महिन्यांपासून वेतनच नाही

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) आटी तत्त्वावर कार्यरत असलेले डॉक्टर, परिचारिका, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, डायलिसिस टेक्निशियन यांचे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे मानधन थकीत असल्याने या आरोग्य कर्मचाऱ्यांपुढे दिवाळीचा सण कशाने साजरा करायचा, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने दिवाळी अगोदर या कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन द्यावे, अशी मागणी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकता
संघातर्फे करण्यात आली.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नवीन ई-स्पर्श प्रणाली कार्यरत करण्याची कार्यवाही राज्यस्तरावर सुरू आहे. मात्र, ही संगणक प्रणाली दिवाळीपर्यंत कार्यान्वित होणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे या अभियाना अंतर्गत कार्यरत असलेल्या राज्यभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे ऑ गस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे मानधन थकले आहे. या कर्मचाऱ्यांपुढे दिवाळी सण साजरा करणे, बँकांचे कर्जाचे हप्ते भरणे, घरगुती खर्च, शैक्षणिक खर्च यांसारखी आर्थिक आव्हाने आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे थकीत मानधन देण्यासाठी 15वा वित्त आयोगाचा जिल्हास्तरावर असणारा अखर्चित निधी वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत (एनएचएम) अनेक पदांवर कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेतन वाढीसह विविध मागण्यांसाठी ऑगस्ट महिन्यात 21 दिवस आंदोलन केले होते. त्यानंतर शासनाने 15 टक्के मानधन वाढ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही मानधनवाढ तर सोडाच; पण मागील दोन महिन्यांचे मूळ वेतनही या कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळाले नाही. दिवाळीच्या अगोदर दोन महिन्यांचे थकीत मानधन मिळणे अपेक्षित होते; पण ते झाले नाही.
हर्षल रणवरे-पाटील, राज्य समन्वयक राष्ट्रीय आरोग्य अभियान.