
एआय तंत्रज्ञानामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीपासून ते हिंदुस्थानातील बंगळुरूपर्यंत टेक सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीचा धडाका सुरूच आहे. ‘ लेऑफ डॉट एफवायआय’ या डेटा प्लॅटफॉर्मनुसार, 2025 हे नोकरकपातीचे वर्ष ठरत आहे. आतापर्यंत 218 हून अधिक कंपन्यांनी एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.
या वर्षी सर्वात मोठी कपात अमेरिकन चिप निर्माता कंपनी इंटेलने केली आहे. कंपनीने जवळपास 22 टक्के म्हणजेच तब्बल 24,000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. अमेरिका, जर्मनी, पोलंड आणि कोस्टा रिका येथील कार्यालयांमध्ये ही कपात करण्यात आली आहे. अॅमेझॉन कंपनीने सुमारे 14 हजार कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले.



























































