
पालघर जिल्ह्यातील विनाशकारी वाढवण बंदर प्रकल्पाविरोधात मच्छीमार, शेतकरी, बागायतदार, आदिवासी भूमिपुत्रांनी सोमवारी हजारोंच्या संख्येने आझाद मैदानात धडक दिली. ‘एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द करा’, ‘समुद्र आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’, अशा घोषणा देत भूमिपुत्रांनी सरकारविरोधात आपल्या हक्कांसाठी एकजुटीने तीव्र एल्गार पुकारला. यावेळी मच्छीमार आणि आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत आपल्या मागण्यांबाबत आवाज उठवला.
वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली अनेक संघटना आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. वाढवण बंदर प्रकल्पासाठी तब्बल 3900 एकर समुद्रात भराव टाकून मासळीच्या पैदास क्षेत्राला कायमचे संपवण्याचे सरकारचे कारस्थान आहे. तसेच जिंदाल बंदर व टेक्स्टाईल पार्कसाठी पर्यावरणाचा ऱहास करून जमिनी बळकावण्याचा सरकारचा डाव आहे. भूमिपुत्रांच्या अस्तित्वावर गदा आणण्याच्या सरकारच्या कारस्थानाविरोधात सोमवारी पालघरसह मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील हजारो मच्छीमार, शेतकरी, आदिवासी भूमिपुत्र एकवटले. वाढवण बंदर प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा, जिंदाल बंदर आणि विनाशकारी टेक्स्टाईल पार्क रद्द करा, ‘चौथी मुंबई’ योजना थांबवा, मुंबईतील कोळीवाडे आणि बाजारांचे पुनर्विकास धोरण मच्छीमारांच्या हिताचे करा, ससून डॉक येथील बंद केलेली गोदामे ताब्यात द्या, कफ-परेड येथील प्रस्तावित ‘मरीना पार्क’ प्रकल्प रद्द करा आदी प्रमुख मागण्यांकडे आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले.
आंदोलकांनी नितेश राणेंच्या भेटीचा प्रस्ताव नाकारला
आंदोलन मागे घेण्यासाठी पोलीस तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱयांकडून प्रयत्न करण्यात आला. यावेळी मत्सोद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घडवून आणण्यासंदर्भातील प्रयत्न मच्छीमार बांधवांनी धुडकावले. आम्हाला आता मुख्यमंत्र्यांशीच चर्चा करायचीय, बाकी कुणाला भेटणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले.
मुंबईतील कोळी बांधवांचाही सरकारविरोधात आक्रोश
वाढवण बंदरासह समुद्रावर अतिक्रमण करणाऱ्या इतर विनाशकारी प्रकल्पांनाही तीव्र विरोध करण्यात आला. आंदोलनामध्ये मुंबईतील कोळी बांधवही मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. सरकार आणि भांडवलदारांच्या युतीतून लादले जाणारे प्रकल्प कदापि खपवून घेणार नाही, असा निर्धार आंदोलनात करण्यात आला. दरम्यान, यासंदर्भात ससून डॉक मासेमारी बंदर बचाव कृती समितीने शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनादेखील पत्र दिले.

























































