भाजप नगरसेवक, बिल्डरमुळे तिघांचा होरपळून मृत्यू; नागरिकांचा आरोप बेकायदा डेब्रिजने अडवला अग्निशमन दलाचा रस्ता, भाईंदर झोपडपट्टी अग्निकांड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवघरच्या मागे कांदळवनात वसलेल्या झोपडपट्टीभोवती बेकायदा डेब्रिजचे डोंगर उभे राहिले आहेत. झोपडपट्टीकडे जाणारे रस्ते या डेब्रिजने अडवल्यामुळे शुक्रवारी आगडोंब उसळल्यानंतर अग्निशमन दलाला घटनास्थळी वेळेत पोहोचता आले नाही. त्यामुळे आग विजेच्या वेगाने भडकली आणि २४ गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. या आगीत तीन रहिवाशांचा होरपळून मृत्यू झाला असून या दुर्घटनेला भाजपचा नगरसेवक आणि या भागात बेकायदा बांधकाम करणारे बिल्डर कारणीभूत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेतील भाजपचे नगरसेवक महेश म्हात्रे यांचा भाऊ हिरेन म्हात्रे यांनी कांदळवनातील जागेत बेकायदा भरणी करून या ठिकाणी झोपडपट्टी उभी केली आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे, इरफान सय्यद व मनसेचे स्थानिक पदाधिकारी हेमंत सावंत यांनी केला आहे. येथे राहणाऱ्या झोपडीवासीयांकडून सुमारे तीन हजार रुपये मासिक भाडे घेतले जाते. याच झोपडपट्टीच्या आसपास बिल्डरांनी मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे. या कामातून निघालेले डेब्रिज या झोपडपट्टीच्या रस्त्यांवर टाकण्यात आल्याचेही या तिघांचे म्हणणे आहे. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास झोपडपट्टीला अचानक आग लागली. मात्र रस्त्यात असलेल्या डेब्रिजमुळे अग्निशमन दलाला घटनास्थळी वेळेत पोहोचता आले नाही. त्यामुळे सुमारे ६० झोपड्या जळून खाक झाल्या. या दुघर्टनेत गुड्डू राम, सूरज मंडळ आणि रोहित मंडळ या तिघांच होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या गाड्या उशिराने पोहोचल्यामुळेच या तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे डेब्रिजचे डोंगर तयार करणाऱ्या बिल्डरांवर आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.