आचऱ्याच्या किनाऱ्यावर बोट उलटली, तीन मच्छीमारांचा बुडून मृत्यू

मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथून मासेमारीला गेलेली जनता जनार्दन मच्छीमार नौका आचरा समुद्रात दुर्घटनाग्रस्त झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत तीन मच्छीमारांचा मृत्यू झाला तर एक मच्छीमार पोहत किनाऱ्यावर येण्यात यशस्वी ठरल्याने बचावला.

मृतात पातीचे मालक सर्जेकोट मच्छीमार संस्थेचे उपाध्यक्ष गंगाराम ऊर्फ जीजी जनार्दन आडकर यांचा समावेश आहे. आडकर हे चौके हायस्पूलमधून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते, तर हडी जठारवाडी येथील लक्ष्मण शिवाजी सुर्वे (65) व प्रसाद भरत सुर्वे (32) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर विजय अनंत धुरत (53) पोहत किनाऱ्यावर पोहचल्याने त्यांचा जीव बचावला. दरम्यान वायंगणी येथे एकाचा तर सापळेबाग किनारी दुसऱ्याचा मृतदेह आढळून आला. सर्जेकोट येथील गंगाराम आडकर हे आपली जनता जनार्दन नावाच्या पातीने रविवारी रात्री देवगडच्या दिशेने समुद्रात मासेमारीला गेले होते. त्यांच्यासमवेत हडी जठारवाडी येथील लक्ष्मण सुर्वे, प्रसाद सुर्वे व मोर्वे येथील विजय धुरत गेले होते. समुद्रात दाट धुके पसरले असल्याने त्यांना परतीचा मार्ग निश्चित करणे अडचणीचे ठरत होते. आचरा समुद्रादरम्यान आले असता अचानक पातीमध्ये पाणी भरू लागले. काही क्षणातच त्यांची पात बुडाली.

मालक आडकर यांनी पात बुडत असल्याची कल्पना देताच आम्ही पाण्यात उडय़ा मारल्या. पोहत पोहत बराच काळ पाण्याशी झुंज देत विजय धुरत आचरा हिर्लेवाडी येथील निखिल पेडणेकर यांच्या घराकडे पोहचले. यावेळी पेडणेकर कुटुंबीयांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करत, त्यांना आचरा आरोग्य केंद्रात हलवले.

नारळी पौर्णिमेच्या दिवशी दुर्दैवी घटना

समुद्रकिनारपट्टीचे सर्व मच्छीमार बांधव नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करून समुद्राला श्रीफळ अर्पण करतात व आपल्या व्यवसायाची सुरुवात करतात. याच दिवशी घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. आज किनाऱ्यालगतचे सर्व मच्छीमार बांधव त्यामुळे दुःखात आहेत. नारळी पौर्णिमेच्या दिवशी अशी दुर्दैवी घटना घडल्याची पहिलीच वेळ असावी, असे स्थानिक मच्छीमार बाबी जोगी यांनी सांगितले.