
बोरिवली आणि विक्रोळी येथे झालेल्या वाहन अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग आणि विक्रोळी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. पहिला अपघात बोरिवलीच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर घडला. राहुल तोडणकर हा मंगळवारी दुपारी मोटरसायकलने बोरिवली येथे गेला होता. तेव्हा भरधाव वेगातील टँकरने त्याला धडक दिली. त्यात राहुलचा मृत्यू झाला. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी या प्रकरणी टँकरचालक प्रवीण भाई पागीला अटक केली, तर दुसऱ्या अपघातात अक्षतसिंग हा तरुण बोरिवलीहून घराच्या दिशेने जात होता तेव्हा त्याला वाहनाने धडक दिली. त्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला असून कस्तुरबा मार्ग पोलीस त्याचा शोध घेत आहेत, तर तिसरी अपघाताची घटना विक्रोळी येथे घडली. एका अनोळखी व्यक्तीला वाहनाने धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला. मृताची ओळख पटलेली नाही.