बावधन परिसरातील डोंगरात हेलिकॉप्टर कोसळून दोन वैमानिकांसह एका अभियंत्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत हेलिकॉप्टर जळून खाक झाले. उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर भरकटल्याने कोसळल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
वैमानिक गिरीशकुमार पिल्लई (53), कॅप्टन परमजीत सिंग (64) आणि अभियंता प्रीतम भारद्वाज (56) या तिघांचा दुर्घटनेत मृत्यू झाला. ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीचे दिल्लीतील हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते. पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टमधील हेलिपॅडवर हेलिकॉप्टर मंगळवारी रात्री मुक्कामाला होते. आज सकाळी साडेसात वाजता या हेलिकॉप्टरने मुंबईतील जुहूकडे उड्डाण घेतले. या हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आणि एक अभियंता होते.
हेलिपॅडपासून दीड किलोमीटर अंतरावरच बावधन परिसरामध्ये के.के. कन्स्ट्रक्शन टेकडी या डोंगराळ भागात धुक्याचा अंदाज न आल्याने हेलिकॉप्टर भरकटले आणि कोसळले. कोसळल्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. त्यामध्ये हेलिकॉप्टर जळून खाक झाले. या भीषण अपघातात तिघांचाही मृत्यू झाला.
सव्वा महिन्यातील दुसरी घटना
मुंबईहून हैदराबादला चाललेले हेलिकॉप्टर 24 ऑगस्ट रोजी मुळशी तालुक्यातील पौडजवळ मुळा नदीच्या काठावर कोसळून चार जण जखमी झाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेला सव्वा महिना उलटत नाही तोच आज (दि. 2) मुळशी तालुक्यातील बावधन येथे हेलिकॉप्टर कोसळले.
सुनील तटकरे यांच्यासाठी निघाले होते हेलिकॉप्टर
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी याच हेलिकॉप्टरने प्रवास केला होता. ते पुण्याहून परळीला गेले होते आणि याच हेलिकॉप्टरने पुण्याला परतले होते. तटकरे हे हेलिकॉप्टर पुण्यातच सोडून मुंबईला रवाना झाले होते. बुधवारी सकाळी या हेलिकॉप्टरने तटकरे यांना घेण्यासाठी पुन्हा मुंबईतील जुहूच्या दिशने उड्डाण केले होते.