
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे तीन लाख चौरस फूट क्षेत्रफळाचे कार्गो हब उभे राहणार आहे. जागतिक मालवाहतूक क्षेत्रात नामांकित असलेल्या फेडेक्स समूहाच्या माध्यमातून उभे करण्यात येणाऱ्या या कार्गो हबचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. फेडेक्स कंपनी या कार्गो हबमध्ये सुमारे अडीच हजार कोटींची गुंतवणूक करणार असून या हबच्या माध्यमातून सुमारे सहा हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
फेडेक्सच्या माध्यमातून साकारण्यात येणारे हे कार्गो हब प्रादेशिक एकत्रीकरण व पुनर्वितरण केंद्र म्हणून डिझाईन करण्यात येणार आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लि. (एएएचएल) या कंपनीसोबत सहयोगाने हा प्रकल्प विकसित होणार आहे. हे हब एनएमआयएच्या (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ) मल्टीमोडल पायाभूत सुविधांचा फायदा घेत पश्चिम हिंदुस्थानातील आंतरराष्ट्रीय व्यापार कॉरिडोरला मजबूत करणार आहे. या हबचे कार्यसंचालन सुरू झाल्यानंतर लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, परिवहन आणि संबंधित सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. याप्रसंगी फेडेक्सचे अध्यक्ष व सीईओ राज सुब्रमण्यम, फेडेक्सच्या एअरलाइनचे सीईओ व इंटरनॅशनलचे सीओओ रिचर्ड स्मिथ, वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, कामी विश्वनाथन आणि एएएचएलचे डायरेक्टर जीत अदानी आदी उपस्थित होते.
नवी मुंबई देशातील सर्वात व्यस्त विमानतळ ठरणार
नवी मुंबई विमानतळावर आज फेडेक्स कार्गो हबचे झालेले भूमिपूजन म्हणजे लॉजिस्टीकच्या इतिहासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. कार्गो हबमुळे मुंबईसह महाराष्ट्र जगाच्या बाजारपेठेशी जोडला जाणार आहे. आकर्षक डिझाईनमुळे नवी मुंबई विमानतळ हे देशातील सर्वात व्यस्त विमानतळ ठरणार आहे. या विमानतळामुळे मुंबई हे देशातील सर्वात मोठे हवाई हब झाले आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.






























































