
चंद्रपूर जिल्ह्यातील मोहाळी येथे आज सकाळच्या सुमारास तीन बिबट्यांनी सहा जणांवर हल्ला केल्याची घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यात सहा जण जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. विजय देवगिरीकर, मनोहर दांडेकर, जितेंद्र दांडेकर, सुभाष दांडेकर, ऋतिक वाघमारे, पांडुरंग नन्नावरे अशी जखमींची नावे आहेत.
सिंदेवाही तालुक्यात शिवनी वनपरिक्षेत्रात हे गाव असून घनदाट जंगलाने वेढलेले आहे. आज सकाळच्या सुमारास तीन बिबटे गावात आले. लोक शेतीच्या कामावर जाण्यासाठी बाहेर पडले असतानाच या बिबट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
हल्ला केल्यानंतर हे बिबटे गावातील घरांत शिरले असून, वन विभागाने तातडीने दखल घेत बिबट्यांनी पकडण्याची मोहीम सुरू केली. आतापर्यंत एक बिबट्या जेरबंद झाला असून, उर्वरित दोन बिबटे पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.