
शहापूरमध्ये तीन लहान बहीणींचा विषबाधेमुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबात शोकाकूल वातावरण आहे. दरम्यान मुलींच्या मृत्यूप्रकरणी नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे.
अन्नातून विषबाधा झाल्याने तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शहापूर तालुक्यातील आस्नोली येथे घडली. काव्या(10), दिव्या(8) व गार्गी भेरे (5) अशी तीन मुलींची नावे असून त्यांना सोमवारी अन्नातून विषबाधा झाली होती. यापैकी दोघींवर नायर व एकीवर एसएमबीटी येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत किन्हवली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पण हा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात असावा असा संशय मुलींच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
शहापुर लगत असलेल्या चेरपोली येथील संदीप भेरे यांची पत्नी संध्या तीन मुलींसह गेल्या आठ महिन्यांपासून तालुक्यातील आस्नोली येथे तिच्या माहेरी राहत होती. सोमवारी 21 जुलै रोजी काव्या, दिव्या व गार्गी या तिघींना पोटदुखी व उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने मुलींच्या आईने आस्नोली येथील खासगी डॉक्टर व नंतर शहापुर उपजिल्हारुग्णालयात दाखल केले. मात्र तिघींची प्रकृती चिंताजनक असल्याने मुंबईच्या नायर व घोटी येथील एसएमबीटी या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परंतु मृत्यूशी झुंज सुरू असताना त्या तिघींवर काळाने झडप घातली. उपचारादरम्यान यामधील काव्या व गार्गी चा गुरुवारी तर दिव्याचा शुक्रवारी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे तालुक्यात चर्चांना उधाण आले असून तर्कवितर्क केले जात आहेत. किन्हवली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्याने शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच चित्र स्पष्ट होईल अशी माहिती किन्हवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी दिली.