औसा तालुक्यातील मौजे बुधोडा येथील तिघांना दुचाकी चोरीप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 लाख 5 हजार रुपये किंमतीच्या 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनात विशेष पोलीस पथक मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या माहितीचे संकलन करीत होते.
या पथकाला शनिवारी माहिती मिळाली की, मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी त्याने चोरलेली मोटरसायकल घेऊन आदर्श कॉलनी परिसरात फिरत आहे. तात्काळ आदर्श कॉलनी परिसरात पोहचून रोडवर मोटरसायकलसह थांबलेल्या अमीर शहाबुद्दीन शेख (वय 31, रा. बुधोडा ता. औसा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत विचारपूस केली असता सांगितले की, ही मोटर सायकल काही महिन्यांपूर्वी मध्यवर्ती बसस्थानक लातूर समोरून चोरी केली आहे. तसेच काही महिन्यापूर्वी लातूर शहरातील विविध ठिकाणाहून आणखी 2 मोटारसायकली त्याचे आणखीन साथीदार उमर मोहम्मद शेख (वय 33, रा. बुधोडा ता. औसा), गौतम न्यानोबा कांबळे (वय 45, रा. बुधोडा ता. औसा) यांनी मिळून चोरी केल्याचे सांगितले.
आरोपींनी विविध ठिकाणाहून चोरी करून लपवून ठेवलेल्या आणखीन दोन मोटारसायकली अशा एकूण तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. त्याची एकूण किंमत 2 लाख 05 हजार रुपये आहे. तसेच आरोपींना अटक करण्यात आली. पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाणे गांधी चौक यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस ठाणे गांधी चौकचे पोलीस अंमलदार नराळे पुढील तपास करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय (लातूर शहर) च्या विशेष पथकातील पोलीस उप-निरीक्षक रामचंद्र ढगे, पोलीस अंमलदार महेश पारडे, अभिमन्यू सोनटक्के व पोलीस ठाणे विवेकानंद चौक चे पोलीस अंमलदार विनोद चलवाड यांनी केली आहे.