
चंद्रपूर जिल्ह्याच्या जंगलात वाघाचा दरारा काय असतो, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा प्रवाशांना आला. चंद्रपूर-मूल महामार्गावर चिचपल्ली गावानजीक एका वाघाने भररस्त्यात गायीची शिकार केली. आजूबाजूला वाहनांची वर्दळ आणि माणसांचा गराडा असतानाही वाघाने अत्यंत निर्भयपणे आपली शिकार रस्त्यावरून फरफटत जंगलात नेली. या थरारक दृश्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, हा मार्ग घनदाट जंगलातून जातो. तिथे हिंस्त्र प्राण्यांचा वावर मोठा आहे. सोमवारी सकाळी चिचपल्ली जवळ अचानक एक वाघ रस्त्यावर आला आणि त्याने गायीवर झडप घातली. शिकार केल्यानंतर वाघ ती गाय रस्त्याच्या मधोमध ओढत नेताना दिसला. एसटी बस आणि कारमधील प्रवाशांनी हा थरार आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला. वाघाचा रुबाब आणि त्याची ताकद पाहून प्रत्यक्षदर्शींच्या काळजाचा ठोका चुकला होता.
चंद्रपूर जिल्ह्याच्या जंगलात वाघाचा दरारा काय असतो, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा प्रवाशांना आला. चंद्रपूर-मूल महामार्गावर चिचपल्ली गावानजीक एका वाघाने भररस्त्यात गायीची शिकार केली. pic.twitter.com/itnoly5RFw
— Saamana Online (@SaamanaOnline) April 6, 2026
वाघाने आपली शिकार रस्त्याच्या अगदी कडेलाच नेऊन ठेवली. नियमानुसार शिकार केल्यानंतर वाघ तिचे रक्षण करण्यासाठी आणि ती खाण्यासाठी पुढचे काही दिवस त्याच परिसरात वास्तव्यास असतो. त्यामुळे या महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागाने या परिसरात गस्त वाढवली असून प्रवाशांना या भागात वाहने न थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




























































