मिंधे गटाचे आमदार संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी आकांडतांडव करणाऱ्या भाजपच्या वाचाळवीर चित्रा वाघ यांनी अचानक भूमिका बदलल्याने उच्च न्यायालयाने त्यांना चांगलेच खडसावले. परिस्थिती बदलली म्हणून लगेच भूमिका बदलू नका. जनहित याचिकेच्याआड खेळ खेळू नका, असे खडेबोल न्यायालयाने वाघ यांना सुनावले.
टिकटॉक स्टारच्या मृत्यू प्रकरणात आमदार राठोड यांचा सहभाग आहे. ऑडिओ क्लिपमध्ये त्यांचा आवाज आहे. याप्रकरणी राठोड यांच्याविरोधात ग्न्हा नोंदवून तपास करावा, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका वाघ यांनी दाखल केली आहे. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.
दरम्यान, त्यावर संतप्त झालेल्या न्यायालयाने वाघ यांचे चांगलेच कान उपटले. अखेर वाघ यांनी याचिका मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली.
पोलिसांनी आवाजाचे नमुने तपासले. आवाज त्यांच्याशी मिळताजुळता नाही, असे मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले. त्याची नोंद करून घेत खंडपीठाने या याचिकेबाबत भूमिका स्पष्ट करण्यास वाघ यांच्या वकिलाला सांगितले. न्यायालयाने ही याचिका निकाली काढावी व अन्य मागणीचे पर्याय खुले ठेवावेत, असे वाघ यांच्या वकिलाने स्पष्ट केले.