प्ले स्टोअरवर टीकटॉकचे रेटींग 4.4 वरून 1.3 झाले, परेश रावल यांचीही बंदीची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीकटॉक हे व्हिडीओ अॅप सतत काही ना काही कारणामुळे वादात सापडलेले असते. कोरोनाच्या उद्रेकानंतर हे अॅप चायनीज असून ते डिलीट करा असे मेसेज व्हायरल झाले आहेत. त्यातच या अॅपवर महिलांविरोधातील हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे व्हिडीओ पोस्ट करण्यात आल्याने टीकटॉकवाल्यांना त्याचा जबर फटका बसला आहे. गुगल प्ले स्टोअरवर या अॅपचं रेटींग 1.3 पर्यंत खाली घसरलं आहे. यातच भर पडलीय ती अभिनेता परेश रावल याच्या ट्विटची, त्यांनीही टीकटॉकवर बंदी आणावी अशी मागणी करून धुरळा उडवला आहे.

टीकटॉकविरोधात वातावरण पेटायला कारणीभूत ठरला आहे तो फैजल सिद्दीकी नावाच्या व्यक्तीने चित्रीत केलेला व्हिडीओ. या व्हिडीओमुळे महिलांवर अॅसिड अॅटॅकसारख्या कृत्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप केला जात आहे आणि म्हणूनच टीकटॉकच्या प्रसिद्धीला उतरती कळा लागली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनीही या व्हिडीओची दखल घेत फैजल सिद्दीकीला अटक करावी अशी मागणी करत महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं होतं. वाढता विरोध पाहिल्यानंतर टीकटॉकच्या प्रवक्त्याने फैजल सिद्दीकीचा व्हिडीओ डिलीट करत असल्याचं आणि त्याचं अकाऊंटही बंद करत असल्याचं सांगितलं.

महिलांवरील अत्याचारांना प्रोत्साहन देणारा हा टीकटॉवरील पहिला व्हिडीओ नाहीये. यापूर्वीही असे वादग्रस्त व्हिडीओ या अॅपवर प्रसिद्ध झाले होते. टीकटॉकवर बंदी यावी यासाठी एक मोहीम सुरू झाली असून अनेकांनी यावरील आपले अकाऊंट बंद केल्याने किंवा हे अॅप घातक असल्याचे म्हटल्याने त्याच्या रेटींगमध्ये कमालीची घसरण झाली आहे. अवघ्या ३-4 दिवसांत या अॅपचे रेटींग 4.4 वरून 1.3 वर आलं आहे. युट्युब वापरणाऱ्यांचाही टीकटॉकच्या वापरकर्त्यांविरूद्ध प्रचंड राग आहे. कॅरीमिनाटी नावाच्या युट्युब चॅनलवरून टीकटॉक वापरणाऱ्यांविरूद्ध आणि सिद्दीकीविरूद्ध शिवराळ भाषेत टीका केली होती. हा व्हिडीओ प्रचंड गाजला होता. त्यातील मजकूर आक्षेपार्ह असल्याने युट्युबने तो डिलीट केला होता. यानंतर टीकटॉकविरोधातील मोहीम आणखीनच तीव्र झालेली पाहायला मिळते आहे.