
>> डॉ. आशुतोष कुलकर्णी, [email protected]
आपल्या वैयक्तिक कामातून वेळ काढून तो दुसऱ्यांसाठी दिला तर खर्या अर्थाने सार्थकी लागेल, असाच काहीसा सकारात्मक विचार देणारी टाईम बँक ही संकल्पना. पाश्चात्य देशात विशेषत ज्येष्ठ नागरिकांसाठी ही संकल्पना अधिक उपयोगात आणली जाते. मिळणारा अधिक वेळ चलनासारखा बँकेत जमा होईल, त्याचा वापर नंतर तीच व्यक्ती आपल्यासाठी करेल. अशी ही छान कल्पना. लोकांकडे असलेल्या वेळेचा हा योग्य उपयोग आहे.
एक 80 वर्षांचे वृद्ध नेहमी दुपारी रणरणत्या उन्हात रक्तदाब तपासायला येतात. येताना बँक, पोस्ट अशी 17 कामे बरोबर घेऊनच बाहेर पडतात. त्यांना अनेकदा सांगूनही ऐकत नाहीत. आम्ही दोघे म्हातारे-म्हातारी माणसे. मग कोण करणार ही कामे हे एक उत्तर ठरलेले.
याचदरम्यान सोशल मीडियावर कोविडच्या काळात इतरांना वेळ देत मदत करू शकतो का, अशी विचारणा झाली. त्याकाळात माणुसकीचे चढ-उतार सर्वांनी अनुभवले. ही माणुसकी शिकवणारी आणि त्याबरोबरच तरुणांना प्रोत्साहन देणारी कल्पना मनाला खूप भावून गेली. आपला वेळ देत टाईम बँकेसारखी ही संकल्पना आहे. स्वित्झर्लंडसारखे युरोपियन देश आता सरासरी वयोमनानुसार वृद्ध होत चालले आहेत. त्यांनीच या टाईम बँक किंवा वेळेच्या पतपेढीच्या कल्पनेला सरकारी धोरणातून राबवले आहे.
आपल्या वैयक्तिक कामातून वेळ काढून तो दुसऱयांसाठी दिला तर तो वेळ चलनासारखा बँकेत जमा होईल, त्याचा वापर नंतर तीच व्यक्ती आपल्यासाठी करेल. अतिशय छान कल्पना आहे. या कल्पनेला मूर्त स्वरूप आणण्यासाठी आपल्या देशातील उद्योगपतींना प्रोत्साहन दिले तर अशा टाईम बँकेत अब्जावधी वेळ जमा होईल. आपल्याकडील लोक अब्जोपती होतील एवढा रिकामा वेळ अनेक लोकांकडे असतो याचा योग्य उपयोग तरी होईल.
सुदृढ तरुण जे चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतात आणि दुसऱयाला मदत करण्याची ज्यांना आवड आहे, त्यांना यासाठी प्रोत्साहन देता येईल. त्यांनी जितका वेळ सेवा दिली, तितका वेळ बँकेत जमा करता येईल. जो पुढे त्यांना त्यांच्या वृद्धापकाळात उपयोगी पडेल. अशी साधीसोपी पद्धत सध्या परदेशातही वापरली जात आहे, ती आपल्याकडेही वापरता येईल. गावांचेही सध्या झपाटय़ाने शहरीकरण होत आहे. त्यामध्ये शहरात निर्माण झालेल्या गृहनिर्माण संस्था म्हणजे एक एक गाव आहे. त्यांना ही योजना अतिशय उपयोगी पडू शकते. त्यामुळे सोसायटीतील एखाद्या तरुणाला या टाईम बँकेनुसार चांगले काम मिळेल. उदाहरणार्थ, एक मुलगी वृद्ध लोकांची काळजी घेण्यासाठी दिवसातील दोन तास घालवते, त्या वेळेत त्यांच्यासाठी किराणा सामान आणणे, घरातील स्वच्छता करणे, त्यांच्याशी गप्पा मारणे, बाहेर फिरवून आणणे इत्यादी अनेकविध सेवा करू शकते.
रुग्ण सेवा करण्यासाठी रुग्ण सहाय्यक केंद्र आजही उपलब्ध आहेत. काही जणांना त्यांची फी परवडते काहींना नाही, पण जर अशी बँक असेल तर तरुण मुले वृद्धापकाळाची तजवीज करून ठेवतील. पैसे साठवून ठेवणे या वयात अवघड असले तरी रिकामा वेळ नक्कीच साठवून ठेऊ शकतील. त्याची शाश्वती शासनाने दिली तरच योग्य उपयोग होईल. वृद्धाश्रमापेक्षा स्वतच्या घरी राहून काळजी घेणारा कोणीतरी थोडय़ा वेळासाठी का होईना असेल तर त्यासारखे भाग्य नाही. भारत सध्यातरी सरासरी वयोमानानुसार तरुण आहे तोपर्यंत या कल्पनेला मूर्त स्वरूप आणणे सोपे जाईल.
रुग्णाची सेवा करणे याव्यतिरिक्त निरोगी, पण वयानुसार थकलेल्या वृद्धांची अनेक प्रकारे मदत याद्वारे करता येईल. त्यासाठी वृद्धानाही आशाळभूतपणे कोण मदत करेल म्हणून वाट बघण्याची गरज नाही. तरुणांनाही यातून काही चांगले मिळत असेल तर टाईम बँक (वेळेची पतपेढी) प्रसिद्ध व्हायला वेळ लागणार नाही. उन्हात तळपत रोजच्या कामासाठी धावपळ करणाऱया वृद्धांचेही जीवनमान सुसह्य होईल.




























































