गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी

गणेशोत्सवासाठी मुंबईतून लाखो चाकरमानी खासगी वाहनांनी कोकणात जातात. त्यांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय आज राज्य शासनाने घेतला. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बंगळुरू महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया वाहनांना व एसटी बसेसना टोल द्यावा लागणार नाही.

कोकणात गणपतीसाठी जाणाऱया चाकरमान्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. गणेशभक्तांच्या वाहनांसाठी ‘गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन’ या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार आहेत. त्यावर वाहन क्रमांक व वाहन मालकाच्या माहितीचा उल्लेख असेल. ते पास संबंधित विभागातील प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. कोकणातून परतीच्या प्रवासासाठीही हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत. यासंदर्भात जनतेला माहिती देण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.