पाकिस्तान, नको रे बाबा! पुन्हा पाऊलही ठेवणार नाही, डॅरिल मिचेलचा निर्णय, टॉम करन लहान मुलासारखा रडला

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. या तणावाचा परिणाम क्रिकेटवरही झाला असून आयपीएल 2025 स्पर्धा आठवड्याभरासाठी स्थगित करण्यात आली. तर पाकिस्तानात सुरू असलेली पीएसएलही स्थगित करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे पीएसएलसाठी पाकिस्तानात आलेले खेळाडू घाईघाईने मायदेशी परतले आहेत. मायदेशी परतताच या खेळाडूंनी युद्धसदृश परिस्थिती असताना पाकिस्तानातील आपला भयावह अनुभव कथन केला आहे.

पीएसएल स्थगित झाल्याने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेमध्ये लाहोर कलंदर्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा बांगलादेशचा फिरकीपटू रिशाद हुसैन दुबईला रवाना झाला. दुबईला पोहोचचात त्याने पाकिस्तानातील भयंकर परिस्थिती सांगितली. पीएसएलमध्ये सहभागी झालेले विदेशी खेळाडू प्रचंड घाबरले असून त्यांनी पाकिस्तान सोडून जाण्याचा प्रयत्न केला. काही खेळाडू विमानतळावर लहान मुलासारखे रडत होते, असे रिशादने सांगितले.

इंग्लंडचा खेळाडू सॅम बिलिंग्स, टॉम करन, डेव्हिड विसे, न्यूझीलंडचा खेळाडू डॅरिल मिशेल, श्रीलंकेचा खेळाडू कुशल परेरा हे सर्वच विदेशी खेळाडू प्रचंड घाबरले होते. दुबई गाठताच मिशेल म्हणाला की, मी पुन्हा पाकिस्तानला कधीच जाणार नाही, असे रिशाद हुसैन याने सांगितले.

काही खेळाडू तर एवढे घाबरले होते की त्यांना रडू कोसळले. इंग्लंडचा खेळाडू टॉम करन लहान मुलासारखा रडला. या कठीण काळात त्यांना सांत्वाना देण्यासाठी, धीर देण्यासाठी काही लोकांची गरज होती. खेळाडूंनी दुबई गाठली आणि तिथून ते मायदेशी परतले, असेही रिशादने स्पष्ट केले.

टॉम करन विमानतळावर पोहोचला तेव्हा त्याला समजले की विमानतळ बंद करण्यात आले आहे. त्यावेळी तो लहान मुलासारखा रडू लागला. त्यावेळी त्याला सांभाळण्यासाठी 2-3 लोकांची गरज होती. आम्ही दुबईत पोहोचलो तेव्हा आम्हाला समजले की आम्ही निघाल्यावर 20 मिनिटांनी विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला झाला. ही खुपच भयानक आणि वाईट बातमी होती. दुबई गाठल्यानंतर आम्ही सुटकेचा निश्वास सोडला, असेही रिशादने सांगितले.